कोळदा येथील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:37+5:302021-08-12T04:34:37+5:30

या वेळी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, ता.नंदुरबार येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी. ...

Participation of 11 self help groups in district level Ranbhaji Mahotsav at Kolda | कोळदा येथील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

कोळदा येथील जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात ११ बचत गटांचा सहभाग

या वेळी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, ता.नंदुरबार येथील डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी. खरबडे, प्रमुख विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.एम.एस. महाजन, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे सल्लागार ललीत पाठक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे आदी उपस्थित होते.

प्रस्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले. यावेळेस नंदुरबार जिल्ह्यात रानभाज्या मुबलक प्रमाणात असून, त्यावर विक्री व्यवस्थापन साखळी व प्रक्रिया उद्योग उभी करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. रानभाज्या महोत्सव सारख्या कार्यक्रमातून रानभाज्या संकलन व संवर्धनाचे कार्य वाढीस लागते असेही त्यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी जैवविविधता संवर्धनाचे महत्व सांगितले. नंदुरबार जिल्ह्यातील रानभाज्या तसेच जैवविविधता यातील प्रयोगांची मांडणी केली. प्रयोगशील शेतकरी रामसिंग वळवी, कंजाला, ता.अक्कलकुवा यांनी स्थानिक स्तरावर रानभाज्या महोत्सवाची उपयुक्तता सांगितली. विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.मुरलीधर महाजन यांनी सद्य:स्थितीतील पीक व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. तसेच बदलत्या हवामानाची परिस्थितीत पीक व्यवस्थापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी. खरबडे यांनी रानभाज्या म्हणजे सुपोषणाचे वरदान असून, रानभाज्यांचा आहारात समावेश करावा,पअसे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात कृष्णदास पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीच्या विकासासाठी विविध उपक्रम चालू असल्याचे व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी संलग्न विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक तंत्रज्ञान प्रसाराचे काम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला. सूत्रसंचालन कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे जे.एन. उत्तरवार तर आभार पी.सी.कुंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नवापूर तालुका कृषी अधिकारी बापु गावीत, प्रभारी तालुका कृषि अधिकारी स्वप्नील शेळके, तंत्र अधिकारी व्ही.डी. चौधरी आदींनी प्रयत्न केले. रानभाजी महोत्सवामध्ये रानभाज्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

सहभागी ११ बचत गटातील ४२ पुरूष व महिलांना सहभाग प्रमाणपत्र व रानभाजी पुस्तिका देण्यात आले. या वेळी बांबूपासून कमी खर्चाचे सोलर ड्रायर बनविणाऱ्या कंजाला, ता.अक्कलकुवा येथील सायसिंग वळवी यांना गौरवण्यात आले. कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध प्रात्यक्षिकांना व रानभाजी प्रदर्शनास मान्यवरांनी भेटी दिल्या.

महोत्सवात नंदुरबार, नवापूर तालुका व स्थानिक परिसरातील कंटोली , तांदुळजा, भोकर, किवाली , रानअळू , चिंच फुले, मटारु (कंद), शेवगा, केना, आंबाडी, बांबुचे कोंब, घोळ, हादगा, तरोटा ( टाकळा ), माटला, गुळवेल, झिला, चुचा भाजी, उखरडा भाजी, पाथरी, भोकर, उंबरा, तोंडली, दगडफळ, लालमाटर, तालीभाजी, पोवाण्या, लाल अंबाडी, करवंद, वंजारी माटला, बेल, आघाडा, कोरमाट, कुरडु, फांग भाजी, मायाळू, कडूकंद आदी रानभाज्यांचा समावेश होता.

Web Title: Participation of 11 self help groups in district level Ranbhaji Mahotsav at Kolda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.