अवाजवी शैक्षणिक फीमुळे पालक चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:14+5:302021-02-09T04:34:14+5:30
कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या शाळा सुरू करण्याच्या दररोज निघणाऱ्या वेगवेगळ्या शासनाच्या शिक्षण विभागाच्या अध्यादेशामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची ...

अवाजवी शैक्षणिक फीमुळे पालक चिंताग्रस्त
कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या शाळा सुरू करण्याच्या दररोज निघणाऱ्या वेगवेगळ्या शासनाच्या शिक्षण विभागाच्या अध्यादेशामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था दिसून येत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’च्या धोरणामुळे अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळांनी सुरू केलेले ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे धडे विद्यार्थ्यांच्या गळी कितपत उतरले हा संशोधनाचा विषय ठरला आहे. शाळेची घंटा काही प्रमाणात पाचवी ते आठवीपर्यंतची वाजली, तोपर्यंतच नवीन शैक्षणिक वर्षासाठी (२०२०-२१) विद्यार्थी, पालकांकडे अवाजवी वाढीव शैक्षणिक फी भरण्याबाबत शिक्षकांमार्फत शाळा व शिक्षण संस्थाचालकांनी लावलेल्या तगाद्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. २७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्याने पाचवी ते आठवीचे विद्यार्थी व पालकांची शाळांकडे धाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र खासगी शाळांकडून गणवेश, पुस्तके, शालेय साहित्य, भरमसाट शैक्षणिक फी मध्ये वाढ करून ती तत्काळ भरण्याबाबत सक्ती केल्यामुळे विद्यार्थी व पालकवर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. शाळेची घंटा वाजली तेवढ्यात सक्तीने अवाजवी आकारलेली शैक्षणिक फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बसूच दिले जाणार नाही, या शाळा प्रशासनाच्या धोरणामुळे विद्यार्थी व पालकांत ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती झाली आहे. कोरोनामुळे नोकरी गेली, हाताला कोठेही काम नाही, शेतीची चक्रे कोलमडली, मोठी आर्थिक चणचण निर्माण झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना आपल्या पाल्याची अवाजवी वाढीव शैक्षणिक फी कशी भरायची याबाबत पालकवर्गातून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. प्रसंगी आम्ही आणखी कर्जाचा डोंगर वाढवू, मात्र अर्ध्या शैक्षणिक वर्षासाठी कमी शैक्षणिक फी आकारली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या कोविड योद्धांप्रमाणेच समाजमनाचे भान राखून शैक्षणिक संस्था चालकांनी माणुसकी दाखवून शैक्षणिक फीमध्ये अर्धी सवलत देऊन दिलासा देण्याची अपेक्षा परिसरातील विद्यार्थी व पालकांसह शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.