तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी पालकांंचे योगदान आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:56+5:302021-06-03T04:21:56+5:30
नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली ...

तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी पालकांंचे योगदान आवश्यक
नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नाही, तसेच पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखणे शक्य आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.
त्या माध्यमातून मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी काळजी घेेणे महत्त्वाचे आहे.
घाबरून जाऊ नका; पण दुर्लक्षही करू नका
लहान मुलांमध्ये लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. अशा वेळी पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते. मोठ्यांनी एसएमएस या त्रिसूत्रीचा वापर केला तर लहान मुले सुरक्षित राहतील. कोरोनाकाळात मुलांना घरातच ठेवा. चाैरस आहारावर भर द्या. तिसरी लाट बालकांवर अटॅक करील याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे घाबरून न जाता कोरोनाला दूर ठेवा.
-डॉ.जयंत शहा, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार
फ्ल्यूची लस टोचून घ्या...
लहान बालकांना कोरोनाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही प्रत्येक पालकाने बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सकस आहार, योगा, प्राणायाम यांना प्राधान्य द्यावे. पावसाळा सुरू होणार असल्याने त्यात व्हायरल इन्फेक्शन बालकांना लागलीच होतात. त्यामुळे फ्ल्यूची लस टोचून घ्यावी. पालकांची भूमिका यात सर्वांत महत्त्वाची राहणार आहे.
-डॉ. युवराज पाटील, बालरोग तज्ज्ञ, नंदुरबार.
बालकांना कोरोनाविषाणू संक्रमणापासून वाचविणेच नव्हे, तर मोबाइलच्या वापर यास पर्याय निर्माण करून बालकांचे आरोग्य सुदृढ कसे राहील यासाठी प्रत्येक पालकाने विशेष खबरदारी बाळगावी, ही काळाची गरज आहे. सध्या एक ते अठरा या वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाबाबत कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही. -डॉ. मालविका कुलकर्णी, बालरोग तज्ज्ञ, शहादा.