दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 19, 2025 06:17 IST2025-10-19T06:13:13+5:302025-10-19T06:17:30+5:30
यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल, या आशेवर असणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे १७० कोटी ८६ लाख रुपयांची मजुरी थकली आहेत.

दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल, या आशेवर असणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे १७० कोटी ८६ लाख रुपयांची मजुरी गेल्या ४ महिन्यांपासून थकली आहेत.
त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे रखडलेली मजुरी शासनाने तत्परतेने देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मजुरांची अपेक्षा आहे. पावसाळ्यापूर्वी रोजगार हमीवर काम करणाऱ्या लाखो मजुरांची १७० कोटी ८६ लाख ५३ हजार रुपयांची रक्कम थकली आहे.
‘मूळवाट’ला उदासीनता
पावसाळा संपल्याने मजुरांना रोजगाराची आवश्यकता असली, तरी मागील थकीत रक्कम न मिळाल्याने रोहयोचे काम पुन्हा मागावे की नाही, असा प्रश्न मजुरांपुढे आहे. आदिवासी जिल्हा नंदुरबारमधील बहुतांश मजूर रोजगारासाठी स्थलांतरित होतात. हे स्थलांतर थांबविण्यासाठी प्रशासनाने स्थानिक स्तरावरच रोजगार देण्यासाठी ‘मूळवाट’चा प्रकल्प सुरू करून मजुरांना रोजगार नोंदविण्याचे आवाहन केले असले तरी थकीत मजुरी न मिळाल्या मजुरांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ कोटी थकीत : सर्वाधिक थकीत मजुरी बीड जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सुमारे ३१ कोटी १८ लाख रुपयांची मजुरीची रक्कम थकीत आहे.