जयनगर परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST2021-09-16T04:37:53+5:302021-09-16T04:37:53+5:30
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात रिमझिम पावसामुळे कापूस पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या संततधार पावसामुळे ...

जयनगर परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर परिसरात रिमझिम पावसामुळे कापूस पिकांचे पूर्णत: नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सततच्या संततधार पावसामुळे कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. तसेच कांदा या पिकाचेही अतिपावसामुळे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी जयनगर शिवारात सततच्या संततधार पावसामुळे कापूस पिकांसह इतर पिकांनाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. जयनगर येथे मध्यंतरी दोन-तीन दिवस वगळता १० ते १२ दिवसांपासून सतत पाऊस चालू आहे. अतिमुसळधार पाऊस नसला तरी मध्यम स्वरूपाचा व रिमझिम पावसामुळे परिसरातील पिकांना फटका बसल्याचे दिसून येत असून, कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पिकांना पावसाच्या पाण्याची अत्यंत गरज होती. मात्र, त्यावेळेस पावसाने खूप दिवस दडी मारल्यामुळे पिके करपून खराब होऊ लागली होती. आता पाऊस आला असला तरी सतत रिमझिम पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी नऊ हजारांच्यावर कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस लागवड केलेले क्षेत्र लाल पडत असून, झाडावरील पाने गळून नुसते काही ठिकाणी काड्या उभ्या दिसत असल्यामुळे समाधानकारक पाऊस पडूनही उत्पन्न निघणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
कांदा पिकावरही अतिपावसामुळे प्रादुर्भाव
शहादा तालुक्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे. मात्र, अतिपावसामुळे सर्वच कांदा लागवड क्षेत्रामध्ये पात पिवळी पडणे, वाफे बसणे यांसारखे प्रकार कांदा लागवड क्षेत्रांमध्ये दिसून येत असून, मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येत आहे. दरवर्षी लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा या वर्षी पावसाळ्यात कांदा लागवड केलेले क्षेत्र शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अतिपावसामुळे तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर फरक पडणार आहे.
रिमझिम पावसामुळे सर्वत्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव आहे. मात्र, लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करून द्यायला हवी. - दिनेश माळी, शेतकरी, जयनगर.