बाहेरगावाहून आलेल्यांंची आरोग्य विभागाकडून काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:21 IST2020-03-24T12:21:45+5:302020-03-24T12:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने ग्राउंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत़ या प्रयत्नात आता तालुकास्तरावर ...

बाहेरगावाहून आलेल्यांंची आरोग्य विभागाकडून काळजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने ग्राउंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत़ या प्रयत्नात आता तालुकास्तरावर बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करुन त्यांच्या तपासण्या सुरु असून सुदैवाने अद्याप एकही संशयित आढळून आलेला नसल्याची माहिती आहे़ या नागरिकांच्या तपासण्या करण्यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे़
नंदुरबार तालुक्यात शनिमांडळ, लहान शहादे, कोपर्ली, आष्टे, नटावद, ढेकवद आदी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या उपकेंद्रांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावोगावी जनजागृती करुन पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद यासह इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन केले होते़ त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत माहिती देण्यास प्रारंभ केला होता़ यातून आरोग्य विभागाकडे माहिती येण्यासह बरेच जण आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात तपासणी करुन घेण्यासाठी हजर झाले होते़ या सर्वांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून त्यातील एकातही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नसल्याची माहिती आहे़ यामुळे या नागरिकांना १४ दिवस घरीच राहण्याचे सूचित करण्यात आले असून त्यांची आरोग्य विभागाचे पथक नियमित तपासणी करत आहे़ दर तीन तासाने या नागरिकांची तपासणी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर गरजेचे साधने पुरवली आहेत़ तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका यांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आह़े़ दर तीन तासांनी होणाºया तपासणीतून किरकोळ आजारही समोर आलेले नसल्याची माहिती असून पुढे १४ दिवस ही प्रक्रिया नियमित सुरु राहणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ जी़डी़ तडवी यांनी दिली आहे़
१ हजार ४४४ नागरीकांची नोंदणी
नंदुरबार तालुक्यातील चार प्राथमिक केंद्र स्तरावर बाहेरगावाहून आलेल्या १ हजार ४४४ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे़ येथील मूळ रहिवासी असलेल्या परंतू नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या या नागरिकांनी सध्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे़ यातून मग ते गावी परतल्यानंतर स्वत: येऊन तपासणी करुन घेत आहेत़ सध्या नंदुरबार तालुक्याच्या विविध गावांमध्ये पुणे, मुंबई तसेच गुजरात राज्याच्या विविध भागातून नागरिक येत असल्याने त्यांना त्यांचे कुटूंबिय आधी आरोग्य केंद्रात जाऊन येण्याच्या सूचना करत आहेत़ यानुसार तपासण्या सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़