जिल्हा रुग्णालयात इतर शस्त्रक्रियांनी घेतला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:46 IST2020-10-22T12:46:23+5:302020-10-22T12:46:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात बंद झालेल्या इतर रोगांच्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणीला पुन्हा सुरूवात झाली ...

जिल्हा रुग्णालयात इतर शस्त्रक्रियांनी घेतला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात बंद झालेल्या इतर रोगांच्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणीला पुन्हा सुरूवात झाली आहे. यातून गेल्या महिन्यात ४०० मातांची प्रसूती झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात सुरू झालेले लाॅकडाऊन त्यानंतर एप्रिल महिन्यात जिल्ह्यात आढळून आलेला पहिला रुग्ण यातून जिल्हा रुग्णालयातील इतर लहान मोठ्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणी करण्याचे काम थांबवण्यात आले होते. तीन महिने हे कामकाज ठप्प झाले होते. परंतू जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर इतर कामकाजाला गेल्या दीड महिन्यात गती देण्यात आली आहे. यातून अस्थीरोग, प्रसूती तसेच इतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये दाखल रुग्णांची संख्यादेखील वाढली असून प्रत्येकाला वेळीच उपचार देत रवाना करण्यावर भर देण्यात येत आहे. तूर्तास गर्भवती माता आणि अपघात झालेल्या रुग्णांची प्रथम प्राधान्याने काळजी घेण्यात येत आहे. तसेच रुग्णालयात दीर्घकाळापासून उपचार घेणार्या रुग्णांची विशेष व्यवस्था करुन त्यांना उपचार दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मातांची प्रसूती
जिल्हा रुग्णालयात गेल्या सप्टेंबर महिन्यात ४४३ मातांची प्रसूती करण्यात आली आहे. यात १५५ मातांची सीझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व माता सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान नवापूर, तळोदा उपजिल्हा व अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात मातांच्या प्रसूतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत २०० च्या जवळपास मातांची प्रसूती झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात ओपीडी सुरु झाली असल्याने दैनंदिन २०० पेक्षा अधिक नागरीकांच्या तपासण्या करुन संदर्भ सेवा देण्यात येत आहे. रुग्णालयाचे कामकाज पूर्वपदावर येवू लागल्याने दाखल रुग्ण संख्याही वाढली आहे. तूर्तास २३० जण रुग्णालयात विविध उपचारांसाठी इलाज घेत असून ३६ जण कोरोना कक्षात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
६४ माेठ्या शस्त्रक्रिया
गर्भवती मातांच्या प्रसूतीसोबत हर्नियासह इतर लहान मोठ्या आजारांवरच्या शस्त्रक्रियाही जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ३० लहान शस्त्रक्रिया, ६४ मोठ्या, ५ अस्थीरोग आणि एक इतर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील सर्व रुग्ण हे सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात येत्या काळात नेत्रतपासणी शिबीरे आणि माेतीबिंदू शस्त्रक्रियाही सुरू होतील अशी शक्यता आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका, परीचर यांचे ड्यूटीचे तास नियमित होत असल्याने त्यांनाही दिलासा मिळाल्याने शस्त्रक्रिया ह्या नियमितपणे पार पडत असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लहान मोठ्या शस्त्रक्रियांना वेग आला आहे. दर दिवशी ठरविक वेळेत शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. अपघाती रुग्णांवर तातडीने उपचार करुन गरज भासल्यास गंभीर शस्त्रक्रियाही पार पाडत आहोत.
-डाॅ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.