सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:19 IST2020-06-30T12:19:37+5:302020-06-30T12:19:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके ...

Order to inspect soybean seeds | सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ या पथकांनी रविवारी उशिरापर्यंत पाच ठिकाणी कारवाई केली़ यात विसरवाडी ता़ नवापूर येथे एका कंपनीचे खत भेसळयुक्त असल्याचे समोर आल्याने संबधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़
राज्यात खरीप हंगामात गुणवत्ता असलेले खत आणि बियाणे यांची विक्री व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथक नियुक्त केले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुका व एक जिल्हास्तरीय पथक नियुक्त करण्यात आले आहे़ या पथकांनी रविवारी अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहिर, नवापूर तालुक्यात खांडबारा, शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तपासणी केली होती़ या दरम्यान या पाच ठिकाणी बियाणे आणि खते यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आल्याने तसेच कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार बंद असल्याने कारवाई करण्यात आली़ या प्रकाराने कृषी सेवा केंद्रांच्या चालक आणि मालकांत खळबळ उडाली असून त्यांनी कंपन्यांकडून आलेल्या मालाची तपासणी करणे सुरू केले आहे़ दरम्यान सोमवारी कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी गोदामे व दुकानांची तपासणी केली आहे़ तालुका आणि जिल्हास्तरावर ही तपासणी होत आहे़
सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत राज्याच्या विविध भागात तक्रारी होत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात ही स्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीसाठी देण्याचे आदेश दिले असून बियाण्यात दोष असल्यास शेतकऱ्यांना ते बदलून देण्याचे आदेश सर्व दुकानदार आणि गोदामे यांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़

अक्कलकुवा तालुकास्तरीय भरारी पथकाने वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील महावीर व नागेश फर्टिलायझर या दुकानांमध्ये तपासणी केली असता, अनियमितता आढळल्याने खत नियंत्रण कायदा १९८५ अन्वये खतव्रिकी बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी गढरी यांनी बजावले यावेळी तालुका गुणनियंत्रण अधिकारी बोराळे उपस्थित होते़
खांडबारा ता़ नवापूर येथील कुबेर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र येथेही खत विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी व्ही़डी़चौधरी यांनी रविवारी काढले आहेत़
खत विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या विक्रेत्यांची कागदपत्रांची तपासणी विभागाकडून केली जात आहे़

जिल्हास्तरीय पथकाने शहादा येथे विजय ट्रेडर्स या दुकानावर रविवारी तपासणी केली होती़ यावेळी याठिकाणी व्यवहार बंद असल्याचे दिसून आल्यानंतर खत व बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश पथकाकडून सांगण्यात आले़ शहादा शहरातीलच सातपुडा कृषी सेवा केंद्रात बियाणे विक्री बाबत अनियमितता आढळून आल्याने येथून पाच कंपन्यांच्या बियाणे विक्रीला बंदी करण्यात आली आहे़
जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांची यादी तयार करुन त्यानुसार विभाग कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांची जनजागृती केली जात आहे़

सोयाबीन बियाणे बाबत राज्य शासनाचे आदेश आहेत़ त्यानुसार तपासणी करुन घेत आहेत़ सर्व सहा पथके जिल्हास्तरावर कार्यरत आहेत़ संपूर्ण खरीप हंगामात दुकानांची तपासणी सुरु राहणार आहे़ बोगस बियाणे व खत आढळल्यास तात्काळ कारवाई होणार आहे़
-नरेंद्र महाले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, नंदुरबाऱ

Web Title: Order to inspect soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.