शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचा सहायक निबंधकांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:49+5:302021-08-13T04:34:49+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा शहरातील महेंद्र सोनार व आनंद महेंद्र सोनार या दोघा शेतकऱ्यांनी २६ फेब्रुवारी २०१९ ...

शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचा सहायक निबंधकांचा आदेश
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा शहरातील महेंद्र सोनार व आनंद महेंद्र सोनार या दोघा शेतकऱ्यांनी २६ फेब्रुवारी २०१९ ला तळोदा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ या सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संस्थेने १ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेल्या सभेत ठराव करून त्यांचे अर्ज नामंजूर केले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था तळोदा यांच्याकडे १६ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ (२) अपील दाखल केले होते. वास्तविक महाराष्ट्र सहकारी संस्था कलम २३ नुसार कोणत्याही संस्थेला पुरेशा कारणावाचून कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यास नकार देता येत नाही. शिवाय अपिलीकार शेतकरी यांच्या मालकीची काजीपूर, तलावडी, ता.तळोदा शिवारात शेतजमीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थेत सभासद करणे क्रमप्राप्त आहे. परंतु संस्थेने केवळ ठराव करून नवीन सभासद करून घेणे बंद केल्याचे कारण दाखवून त्यांचे सदस्यत्व नाकारणे उचित नाही. बरेच सभासद हे फक्त संघाकडून डिव्हीडंड, रिबेट आदी लाभ व राजकीय उद्देशाने सभासदत्व घेतात, असे कारण दाखविणे योग्य नसल्याचे सहायक उपनिबंधक यांनी नमूद करून शेतकरी महेंद्र सोनार व आनंद सोनार यांना तातडीने तळोदा तालुका खरेदी-विक्री सहकारी संघ सदस्यत्व देण्यात यावे अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सहायक निबंधक रणजित पाटील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडून ॲड.सचिन राणे यांनी काम पाहिले.
दरम्यान, सहायक निबंधकांच्या या आदेशामुळे तळोदा शहरातील सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारास यामुळे वचक बसला आहे.
नवीन सभासद करण्याची सूचना
तळोदा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ ही संस्था तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जात आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांची सभासद नोंदणी वाढविणे गरजेचे आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.