लॉकडाऊन काळात फक्त सहाच नोंदणी विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:48 IST2020-07-11T12:48:46+5:302020-07-11T12:48:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा ...

लॉकडाऊन काळात फक्त सहाच नोंदणी विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा होती़ मात्र गेल्या तीन महिन्यात विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे केवळ ६ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले असल्याची माहिती समोर आली आहे़
जिल्ह्यासाठी सहायक दुय्यम निंबधक वर्ग-१ या कार्यालयात विशेष विवाह अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांना नोंदणी पद्धतीने विवाह करुन देत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ १९५४ च्या विशेष विवाह कायद्यानुसार येथे नोंदणी विवाहाचे कामकाज सुरू आहे़ परंतु लॉकडाऊनमुळे एक महिना हे कार्यालय बंद असल्याने ज्यांनी नोंदण्या करुन ठेवल्या होत्या़ त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता़ जिल्ह्यातून सहाच जणांनी नोंदणी विवाह केल्याने आजही जिल्ह्यात याबाबत उदासिनता असल्याचे स्पष्ट होत आहे़ संबधित कार्यालयाकडून तातडीने प्रमाणपत्र देऊन शासनदरबारी तशी तातडीची नोंद करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़
एकीकडे नोंदणी विवाहांबाबत उदासिनता असताना दुसरीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरणही लॉकडाऊनमुळे संथ झाले होते़ या कामांनाही आता गती देण्यात येत असून नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावर कामकाज सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांना निबंधकाचा दर्जा देऊन त्यांच्याकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्ममृत्यू दाखले देण्याची तरतूद आहे़ तर नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांच्या आदेशाने दाखले दिले जातात़ सलग तीन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसह जन्ममृत्यू दाखले मिळण्यास अडचणी येत होत्या़ मात्र मिशन बिगीन अंतर्गत दाखले वितरणासाठी पालिका, नगर आणि ग्रामपंचायत यांनी मागील रखडलेले दाखले वितरण करण्यास सुरूवात केली आहे़ जिल्हाभरात गेल्या एक महिन्यात तीन हजाराच्या जवळपास जन्मृमृत्यूचे दाखले दिले गेल्याची माहिती आहे़
नंदुरबार नगरपालिकेकडून गेल्या तीन महिन्यात २२ जणांच्या विवाह नोंदण्या करुन प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे़ विवाह झालेल्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर हे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़
एकीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जात असताना दुसरीकडे लॉकडाऊन काळात घरगुती कार्यक्रम म्हणून झालेल्या विवाह सोहळ्यांसाठी पत्रिका छापली गेली नसल्याने विवाह नोंदणीसाठी पुरावा म्हणून काय द्यावे अशा विवंचनेत विवाह करणारे असल्याचे चित्र आहे़