१४०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:39 IST2020-07-31T12:39:02+5:302020-07-31T12:39:09+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम, अतिदुर्गम भागात विस्तारला असल्याने आणि त्यातच आरोग्याचा ...

Only one health worker for every 1400 people | १४०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

१४०० लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम, अतिदुर्गम भागात विस्तारला असल्याने आणि त्यातच आरोग्याचा रिक्त पदांची मोठी संख्या पहाता प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यास प्रशासनाची प्रचंड कसरत होत आहे. आरोग्य विभागातील भरलेली पदे आणि जिल्ह्याची लोकसंख्या पहाता सुमारे १४५० लोकांमागे एक आरोग्य कर्मचारी काम करीत असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे चित्र पहाता जिल्ह्यात ग्रामिण भागात ६० आरोग्य केंद्र आणि ९० आरोग्य उपकेंद्र कार्यान्वीत आहेत. याशिवाय शहरी भागात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय कार्यान्वीत आहे. जिल्हा निर्मितीनंतर २२ वर्षे झाली असली तरी अद्यापही जिल्हा रुग्णालयालया मूर्त स्वरूप मिळालेले नाही. येथील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. ३०८ पैकी केवळ १४३ पदे भरण्यात आली असून १६५ पदे रिक्त आहेत. याशिवाय महिला रुग्णालयाला मंजुरी मिळाली असली तरी त्यातील मंजूर १९ पदांपैकी सर्व पदे रिक्त आहेत. क्षयरोग केंद्रातील १७ मंजूर पदांपैकी केवळ चार पदे भरली असून १३ पदे रिक्त आहेत. उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालयांमध्ये देखील एकुण ३२८ पदे मंजुर आहेत. त्यापैकी केवळ १८४ पदे भरण्यात आली असून १४३ पदे रिक्त आहेत. तशीच अवस्था आरोग्य केंद्रांची आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये एकुण एक हजार ६६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६६२ पदे भरली असून ४०४ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातीलही एकुण मंजूर पदांपैकी पाच पदे रिक्त आहेत. एकुणच जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असतांना रिक्त पदांची संख्याही भरली जात नसल्याने प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा तोडकी पडत असल्याचे चित्र आहे. सध्या कोरोना महामारीमुळे आरोग्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असला तरी त्याला मूर्त स्वरूप कधी मिळेल याची प्रतिक्षा आहे.

जिल्हा रूग्णालयात
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचारासाठी ३८ व्हेंटीलेटर्स व ३० आॅक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. येत्या आठवड्यात त्यात आणखी १३५ आॅक्सिजन बेड्सची भर पडणार आहे.याशिवाय इंजेक्शनही मुबलक प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.

तालुकानिहाय उपलब्ध रूग्णवाहिका
नंदुरबार (१८), शहादा (१९), तळोदा (८),
नवापूर (१४), अक्कलकुवा (१४), धडगाव (१४)

आरोग्य अधिकारी
जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम भागात असल्याने आरोग्य सेवेसाठी कसरत करावी लागते. रिक्त पदे असली तरी ११५० आशा वर्कर तसेच नवीन पदे भरणे सुरू झाले आहे. याशिवाय आदिवासी विकास विभागातून १४ नवीन आरोग्य केंद्र आणि इतर ५० उपकेंद्रांचा प्रस्ताव असून त्यालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आरोग्याचे जाळे जिल्ह्यात अधीक व्यापक करण्यासाठी प्रयत्न असून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे.
-नितीन बोडके,
जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा आणि ग्रामिण रुग्णालयातील यंत्रणेमार्फत रुग्णांना सेवा देण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. रिक्त पदांची अडसर असली तरी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधीक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महिला रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागेल. याशिवाय कोविड तपासणीसाठी आधुनिक प्रयोगशाळा आठवडाभरात कार्यान्वीत होईल.
-डॉ. आर.डी.भोये,
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Only one health worker for every 1400 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.