मुख्य सूत्रधार मात्र फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:13 IST2020-03-07T13:13:07+5:302020-03-07T13:13:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मलोणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय पथकाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या दोघांना ...

Only the main source escapes | मुख्य सूत्रधार मात्र फरारच

मुख्य सूत्रधार मात्र फरारच

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मलोणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय पथकाने बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन सुमारे १२ लाख ६६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी अटकेत असलेल्या मध्य प्रदेशातील दोघा संशयितांना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित भटू वाणी हा अद्याप फरार आहे.
३ मार्चला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या भरारी पथकाने शहाद्यात मोठी कारवाई करीत बनावट मद्य निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी घटनास्थळावरून यम्मो उर्फ इरफान रशीद मनियार (२२, रा.खेतिया, ता.पानसेमल), साबीर मुशीर पिंजारी (४१, रा.५८, गांधी मार्ग, खेतिया, रिव्ह्युन्यूव एरिया) या दोन आरोपींंना अटक केली होती. न्यायालयाने ६ मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार भटू वाणी नामक संशयीत व्यक्ती फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मुख्य संशयित भटू वाणीच्या शोधार्थ उत्पादन शुल्क विभागाचे पथक कार्यरत असून त्याचा शोध धुळे व मध्य प्रदेशात घेतला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे धुळ्यापर्यंत पोहोचले असून वाणी हा धुळे येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे. यावरून हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येते. मध्य प्रदेशातील व धुळे येथील संशयितांचा यात सहभाग असल्याने या प्रकरणाचे पाळेमुळे शोधून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही शहर व परिसरातील ढाब्यांवर विनापरवाना अवैधरित्या मद्य विक्री सुरूच आहे. या ढाबे चालकांना नियमबाह्यरित्या मद्याचा पुरवठा करणाºयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांसमोर आहे.

Web Title: Only the main source escapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.