ज्यासनी लस लिदी तो भाग्यशाली शे... -जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:19+5:302021-05-28T04:23:19+5:30
शहादा तालुक्यातील बिलाडी त.सा. येथे ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल, शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोरोना चाचणी ...

ज्यासनी लस लिदी तो भाग्यशाली शे... -जिल्हाधिकारी
शहादा तालुक्यातील बिलाडी त.सा. येथे ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल, शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व कोरोना चाचणी शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रघुनाथ गावडे, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.नारायण बावा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी, जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, हेमलता शितोळे, सरपंच जवाहर पाटील, पं.स.चे माजी सदस्य सखाराम पाटील, अनिल पाटील, उपसरपंच गुलसिग दशरथे, सिद्धार्थ सामुद्रे, पोलीस पाटील गणेश पाटील, वसंत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, ग्रामसेवक बी.बी. गिरासे, तलाठी एम.बी. महाले आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले की, राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सगळ्यात जास्त असून ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचे खरे श्रेय जनतेला जाते. शासनाने दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन केल्यामुळे हे शक्य झाले. यापुढेही आपण शासनाला सहकार्य करून लसीकरण करण्यासाठी स्वतःहून पुढे येऊन मित्रमंडळी व नातेवाइकांनाही प्रोत्साहित करावे. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगून लसीकरणाची जनजागृती करणाऱ्या शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचेही त्यांनी कौतुक केले. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अभिजित पाटील यांनीही लसीकरणाबाबत महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन सचिन पत्की यांनी तर आभार प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल, शिक्षण, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरात ९२ वर्षीय रतनबाई पटेल या दिव्यांग आजीबाईंनी वॉकरच्या सहाय्याने शिबिरस्थळी येऊन लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या आजीबाईंचे तोंड भरून कौतुक केले. इतरांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन या आजीबाईंनी केले.
बिलाडी त.सा. येथील आदिवासी वस्तीतील ४५ वर्षांवरील १७६ लाभार्थींपैकी यापूर्वी एकच लाभार्थी होते. ते म्हणजे भाईदास भिल. त्यांनी सर्वात अगोदर लसीकरण केल्याने ‘हाऊ भाग्यशाली कोण शे रे भो... त्यासनाबी आपण सत्कार करी लिहूत...’ अशा अहिराणी भाषेतून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर डॉ.भारुड व मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांच्या हस्ते भाईदास भिल यांचा सन्मान व सत्कार सत्कार केला.
बिलाडी येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाच्या जनजागृती नाटिका सादर केली. विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे ‘अम्हू बी लस लीन्हत तुम्हू बी लस ल्या...’ ही नाटिका सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व लसीकरण मोहिमेत परिश्रम करणाऱ्या सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत १०० टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचाही सन्मान सत्कार करण्यात येईल, असे आश्वासित केले.