एक लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:41 IST2020-05-12T12:41:43+5:302020-05-12T12:41:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुका कृषी विभाग शहादा व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी नंदुरबार यांनी सोमवारी कहाटूळ येथे ...

एक लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुका कृषी विभाग शहादा व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी नंदुरबार यांनी सोमवारी कहाटूळ येथे मोहन पाटील यांच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किमतीचे कापसाचे एचटी बीटी कंपनीचे बोगस बियाणे जप्त केले आहे.
राज्य शासनामार्फत कापसाच्या बियाण्याची परवानगी विक्रेत्यांना मिळालेली नाही. अनेक शेतकरी हे मे महिन्यात कापसाची लागवड करतात. मात्र बियाणे उपलब्ध नसल्याने गुजरात व मध्य प्रदेश या भागातील अनेक बोगस कंपन्यांचे बियाणे खरेदी करतात. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होते. असाच काहीसा प्रकार कहाटूळ येथे उघडकीस आला आहे. कहाटूळ येथील मोहन पाटील यांच्या घरी बोगस कापसाच्या बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून छापा टाकला असता तेथे सुमारे एक लाख रुपये किमतीचे एचटी बीटी कंपनीचे बोगस बियाणे छाप्यात मिळून आले. ही कारवाई जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नरेंद्र पाडवी, मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल व पोलीस कर्मचारी प्रकाश अहिरे यांच्या पथकाने केली आहे. शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.