नंदुरबारातील अहिल्यादेवी विहिरीत पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:38 IST2020-08-09T12:38:01+5:302020-08-09T12:38:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्य व दाट लोकवस्तीत असलेल्या अहिल्यादेवी विहिरीत सकाळी ११ वाजता एकाचा मृतदेह आढळून आला. ...

नंदुरबारातील अहिल्यादेवी विहिरीत पडून एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मध्य व दाट लोकवस्तीत असलेल्या अहिल्यादेवी विहिरीत सकाळी ११ वाजता एकाचा मृतदेह आढळून आला. मयत हा नंदुरबारातील चिराग गल्ली परिसरात राहणारा आहे. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विहिरीला कुंपन केलेले आहे. परंतु गेट उघडे राहत असल्यामुळे ही घटना घडली. विहिर कायमस्वरूपी बंदीस्त ठेवावी अशी मागणी होत आहे. यापूर्वीही या विहिरीत अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.
बदरुज्जमाखान अजीजउल्लाखान खतीम (४५) रा.चिरागगल्ली असे मयताचे नाव आहे. त्याचा भाऊ शफीउल्ला खतीम यांनी याबाबत फिर्याद दिली. सकाळी भाऊ कामानिमित्त बाहेर जातो असे सांगून गेला. दुपारी साडेअकरा वाजता भाऊ अहिल्यादेवी विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. दरम्यान, विहिरीत एक व्यक्ती पडल्याचे समजल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. खतीम यांना बाहेर काढले असता काहींनी त्यांना ओळखले. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, विहिरीत यापूर्वी झालेल्या आत्महत्या लक्षात घेता कुंपन करण्यात आले आहे. परंतु एक दरवाजा उघडा राहत असल्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे विहिर बंदीस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे. विहिरीतील मंदीरात श्रावण महिन्यात पुजेसाठी काहीजण येत असल्याने हा दरवाजा उघडा ठेवल्याचे सांगण्यात आले.