लोकसेवकास लाच प्रकरणी एक दिवसाची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST2021-04-07T04:31:19+5:302021-04-07T04:31:19+5:30
नवापूर : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र निंबा कानडे यांनी आधारकार्ड जोडणीसाठी ८ हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी ...

लोकसेवकास लाच प्रकरणी एक दिवसाची कोठडी
नवापूर : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र निंबा कानडे यांनी आधारकार्ड जोडणीसाठी ८ हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक रवींद्र कानडे यांस नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सुत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील २७ वर्षीय तक्रारदार यांच्या मामाचे रेशन दुकान असून, तक्रारदार हे शासकीय कामात त्यांना मदत करतात. सध्या शासनाने रेशन दुकानातील खातेदारांचे रेशनकार्ड आधार कार्डाशी जोडणेबाबत बंधनकारक केले असल्याने सदरच्या कामासाठी तक्रारदार तहसील कार्यालय, नवापूर येथे लोकसेवक पुरवठा निरीक्षक रवींद्र कानडे यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदाराकडे रेशन कार्ड आधारकार्डशी जोडणी करण्यासाठी एका रेशन दुकानाचे एक हजार याप्रमाणे दोन्ही दुकानाचे २ हजार व ४ महिन्याचे एकूण ८ हजार रूपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून पंच व साक्षीदार यांच्या समक्ष लाचेची मागणी २८ रोजी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरवठा निरीक्षक रवींद्र कानडे यांस नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.