१८ लाख लोकांसाठी दीड हजार बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:26 IST2020-09-23T12:26:47+5:302020-09-23T12:26:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण ठरत आहे़ यात प्रामुख्याने रुग्णांना उपचार देण्यासाठी लागणारे ‘बेड्स’ अर्थात ...

१८ लाख लोकांसाठी दीड हजार बेड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे आरोग्य सेवा महत्त्वपूर्ण ठरत आहे़ यात प्रामुख्याने रुग्णांना उपचार देण्यासाठी लागणारे ‘बेड्स’ अर्थात खाटा उपलब्ध करुन देणे सर्वाधिक गरजेचे आहे़ परंतु जिल्ह्यात कोरोनासह इतर आजारांवर उपचार देण्यासाठी केवळ दीड हजार खाटा उपलब्ध असून यातही प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटा वजा केल्यास केवळ १ हजार बेड्स जिल्ह्यात उपलब्ध आहेत़
सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुधारत असल्याचा दावा गेल्या काही महिन्यांपासून होत आहे़ परंतू कोरोनामुळे होणारे मृत्यू तसेच बाधित व्यक्तींना मिळणारे अपुरे उपचार यामुळे या दाव्यांना सुरुंग लागत आहे़ आरोग्य विभाग सातत्याने बेड्स असल्याचे सांगत असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात पोहोचलेला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सुनियोजित व्यवस्था नसल्याचे चित्र आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर रुग्णांसाठी बेड उपलब्ध असले तरी तेथे उपचार देण्याची व्यवस्थाच नसल्याने ते निरूपयोगी ठरत आहेत़ जिल्हा प्रशासन नवापूर आणि शहादा येथे ३० बेड्सचे कोविड हॉस्पिटल निर्माण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ परंतू हाती असलेल्या खाटा दुरूस्त करुन ग्रामीण स्तरावर कोविड उपचार देण्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले गेलेले नाही़
नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात २००, दोन उपजिल्हा रुग्णालयात १००, जिल्ह्यातील १४ ग्रामीण रुग्णालयांमध्ये ४२० बेड्स उपलब्ध आहेत़ ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या ६० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३६० बेड्स उपलब्ध आहेत़ प्रत्येक केंद्रात किमान सहा खाटांची व्यवस्था आहे़ यातील बहुतांश ठिकाणी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले असता आरोग्य केंद्र आणि तालुकास्तरावर असलेले ग्रामीण रुग्णालय ओस पडल्याचे दिसून आले आहे़ यातून जिल्हा मुख्यालय वगळता इतर ठिकाणी उदासिनता असल्याचे दिसून आले़
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर जिल्ह्यात सध्या १७९ वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत़ यात तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकरी यांचा समावेश आहे़ तर ६१२ आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहेत़ दुसरीकडे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर आदी ७०० कर्मचारी सेवा बजावत आहेत़ जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत दीड हजार खाटा आणि तेवढेच कर्मचारी यामुळे आरोग्य सुविधा कमकुवत झाल्याचे स्पष्ट होत आहे़
जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवेचा पसारा मोठा असला तरी सुविधांअभावी ही सेवा मागे पडली आहे़ दुसरीकडे नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यात खाजगी डॉक्टरांची संख्या ही ३० च्या जवळपास आहे़ या डॉक्टरांकडे ३०० च्या जवळपास बेड उपलब्ध आहेत़ तर तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा येथे दीर्घकालीन उपचार देण्यासाठी १५० च्या जवळपास खाटा उपलब्ध आहेत़
४कोरोना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने २४० खाटांची व्यवस्था केली आहे़ शहादा येथेही कोविड उपचार केले जात आहेत़ सोबत नंदुरबार, नवापूर, शहादा येथे खाजगी कोविड हॉस्पिटल्स सुरू झाले आहेत़ खाजगी आणि शासकीय मिळून जिल्ह्यात ४५० बेड्स कोरोना उपचारासाठी परंतु रुग्ण संख्या पाहता ह्या खाटाही अपुऱ्या पडत आहेत़