जामतलाव गावातून खैर जातीचे दीड लाखांचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:56+5:302021-05-31T04:22:56+5:30
नवापूर: तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या पथकाने दीड लाखांचे लाकूड जप्त केले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामतलाव ...

जामतलाव गावातून खैर जातीचे दीड लाखांचे लाकूड जप्त
नवापूर: तालुक्यातील जामतलाव येथे वन विभागाच्या पथकाने दीड लाखांचे लाकूड जप्त केले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामतलाव येथील महादेव मंदिराच्या पाठीमागील भागात संशयित पांढऱ्या रंगाचा पिकअप (क्रमांक जीजे ०९ - झेड ४३०५) वाहनात लाकूड असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता या वाहनात खैर प्रजातीचा साल काढलेला लाकूडसाठा आढळून आला. खैर लाकूड दीड लाखांचे असून, ३ लाखांचे वाहन असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून नवापूर वन आगारात जमा करण्यात आला. ही कारवाई वनपाल डी.के. जाधव, वडकळंबी वनरक्षक दीपक पाटील, कल्पेश अहिरे, प्रशांत सोनवणे, संगीता खैरनार, भाग्यश्री पावरा, कमलेश वसावे, रामदास पावरा यांनी केली.
यासाठी नवापूर पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, पोलीस शिपाई रणजित महाले, सुनील निकम, नामदेव राठोड आदी उपस्थित होते.
नवापूर वन विभागाकडून झालेल्या कारवाईत खैर लाकूड व वाहन असा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. याबाबत वनपाल वडकंळबी यांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा, विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार तसेच वनक्षेत्रपाल नवापूर (प्रादेशिक) यांचे मार्गदर्शनाखाली रेंज स्टाफ नवापूर तपास करीत आहेत.