लिपिकावरच रोज लाखोंचा महसूल देणाऱ्या कार्यालयाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:31+5:302021-07-20T04:21:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरूपी पूर्ण वेळ निबंधक अधिकारी मिळत नसून, ...

लिपिकावरच रोज लाखोंचा महसूल देणाऱ्या कार्यालयाचे काम
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरूपी पूर्ण वेळ निबंधक अधिकारी मिळत नसून, सध्या लिपीकावरच रोज लाखोंचा महसूल देणाऱ्या कार्यालयाचे काम भागविले जात आहे. मात्र, काम करताना अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नियमित, पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तळोदा येथील दुय्यम निबंधक अर्थात विविध शासकीय दस्तावेज नोंदणी कार्यालय प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. दस्तावेज नोंदणीसाठी शहाराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या संख्येनं वर्दळ असते. परंतु या कार्यालयात गेल्या तीन वर्षापासून दुय्यम निबंधक अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. जिल्ह्यातील इतर कार्यालयातील अधिकाऱ्यांवरच काम भगविले जात आहे. तेही लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्याची अशा महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात या लिपिकास संबंधित अधिकारीच्या काम काजाचे प्रशिक्षण या विभागकडून दिले जात असले तरी ते परिपूर्ण नसते. त्यामुळे संबंधित कर्मचारी एखाद्या क्लिष्ट प्रकरणांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत मागवित असतो, अशावेळी प्रचंड खोळंबा होत असतो. यामुळे नागरिकांनादेखील नाहक वेळ वाया घालवावा लागत असतो. वास्तविक नागरिकांकडून विविध दस्तावेज नोंदणीसाठी मोठा महसूल पोटी वर्षाला १० ते १२ कोटींची रक्कम केवळ तळोदा कार्यालयाकडूनच मिळत असल्याचे म्हटले जाते. त्यातही खरेदी खत, हक्कसोड पत्र, गहाण खत, बक्षीस पत्र, प्रत्यातरण पत्र, बिनाताबा सौदा पावती, दत्तक पत्र अशा नोंदनी तर रोजच केल्या जात असते. साहजिकच या कार्यालयाला पूर्णवेळ दुय्यम निबंधक देणे अत्यंत गरजेचे असताना केवळ काम चलावू कर्मचारी देण्यात येत असल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने या प्रकरणी दखल घेवून कायम स्वरूपी अधिकारी नियुक्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी विविध संघटना व लोकप्रतिनिधींनी देखील साफ दुर्लक्ष केल्यामुळे नाराजीचा सुर उमटत आहे. दरम्यान येथील दुय्यम निबंधक अधिकारी नेमणुकीसाठी प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. त्यावर कार्यवाही होण्या ऐवजी तो धूळखात पडला असल्याचे म्हटले जात आहे.
कार्यालयही अपुऱ्या जागी
येथील प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी सदर कार्यालय देण्यात आले आहे. तेही दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. असे असले तरी ती जागा अत्यंत अपुरी पडत आहे. कारण विविध दस्तावेज नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तेथे बसण्यासाठी जागा नसते. साहजिकच नागरिकांना गॅलरीत बसावे लागते. महिला ताशाच अस्वच्छ जागेवर बसतात. पुरुषांना तर आपले काम पूर्ण होईपर्यंत तसेच तालकळत उभे राहावे लागते. त्यातच येथूनच इतर कार्यालयात कामकाजासाठी जाणाऱ्या, येणाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत असतो. वास्तविक या कार्यालयात दस्तावेज नोंदणी करण्याकरिता येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. ही वस्तू स्थिती लक्षात घेवून महसूल प्रशासनानेदेखील प्रशस्त रूम त्यांना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. आता तरी ही बाब लक्षात घेवून प्रशस्त ठिकाणी स्तलांतरित करावे, अशी मागणी आहे.