नायलॉनचा मांजा यंदाही करतोय अनेकांना जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:46 IST2019-12-29T12:46:27+5:302019-12-29T12:46:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतंगोत्सवात यंदा चायनामेड मांजाची धूम आहे. परंतू हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे ...

Nylon cats are also doing so | नायलॉनचा मांजा यंदाही करतोय अनेकांना जायबंदी

नायलॉनचा मांजा यंदाही करतोय अनेकांना जायबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतंगोत्सवात यंदा चायनामेड मांजाची धूम आहे. परंतू हा मांजा अनेकांना जायबंदी करणारा ठरत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यासाठी दबाव वाढत आहे. प्रशासनाने मात्र त्याकडे अद्यापही गांभिर्याने पाहिले नाही. दरम्यान, नॉयलॉनच्या दोराला बंदी असतांनाही त्याची सर्रास विक्री होत आहे. चायना मांजामध्ये देखील नॉयलॉनचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे.
नंदुरबारात मकरसंक्रांतीला पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी दोन ते तीन आठवडेआधीपासूनच तयारीला वेग येतो. १५ दिवसांवर हा उत्सव येवून ठेपल्याने तयारीला वेग आला आहे. शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर विविधरंगी पतंगांनी दुकाने थाटली आहेत. शिवाय पारंपारिकपद्धतीने मांजा तयार करण्यासाठी देखील गर्दी होऊ लागली आहे. येत्या येत्या आठवड्यात या माध्यमातून उलाढाल वाढणार आहे.
चायना मांजा
पतंग उडवितांना मांजा महत्त्वाचा घटक असतो. जेवढा मजबूत मांजा तेवढे पतंग उडविण्याचा आनंद अधीक असतो. शिवाय प्रतिस्पर्धीची पतंग कापण्यासाठी देखील अशा मांजाची गरज असते. त्यामुळे मजबूत व धारधार मांजाची मागणी युवकांकडून आहे. यंदा चायना मांजा पतंगांच्या बाजारात धूम करीत आहे. इतर मांजापेक्षा स्वस्त असल्यामुळे त्याला मागणी असली तरी हा मांजा अनेकांच्या जीवावर उठला आहे. तुटून खाली पडला किंवा कशात अडकलेला मांजा मानवी शरिराच्या संपर्कात येवून अडकला तर मोठी जखमी करीत आहे. त्वचेत अडकल्यावर त्वचा फाडल्याशिवाय तो निघत नाही.
अनेकवेळा त्याला त्वचेतून कापून बाहेर काढावे लागते. नॉयलॉन मिश्रीत हा दोरा असून त्याचा मजबूतपणा आणि टिकाऊपणा यामुळे तो तरुणांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय स्वस्त देखील आहेच.
साडेतीनशे ते पाचशे रुपयांना पाच ते सहा हजार रुपये वार या प्रमाणे तो बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय आकाशात उडणाऱ्या पक्षांना देखील हा मांजा जायबंदी करीत आहे. चायना मांजावर बंदी घालावी अशी मागणी पतंगोत्सवात दरवर्षी करण्यात येते परंतू प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. यंदा देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना आणि पक्ष्यांना जीवघेणा ठरणारा या मांजाची विक्री स्वत: विक्रेत्यांनीच बंद करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
पारंपारिक मांजा
पारंपारिक मांजा बनविण्यासाठी कारागिरांकडे गर्दी वाढली आहे. शहरात २० ते २५ कारागिर असून गेल्या आठवड्यापासून मांजा तयार करण्यासाठी युवकांची गर्दी होत आहे. मांजा तयार करण्याचीही एक खास पद्धत व शैली आहे. त्यासाठी बाजारातून चक्री व दोरा कारागिरांकडे द्यावा लागतो.
कारागिर लाख, काचेचा चूरा आणि इतर साहित्याचा खळ तयार करून तो या मांजाला लावत असतो. किमान तीन ते पाच हजार वार याप्रमाणे तो बनविला जातो. सध्या मांजा बनवून घेण्याकडे देखील तरुणांचा कल वाढला आहे. येत्या काळात पतंगोत्सवाची धूम आणखी वाढणार असून बाजारातील उलाढालही वाढणार आहे.

पतंगांचे वेगवेगळे प्रकार...
यंदा पारंपारिक पतंगासह विविध आकार व प्रकारातील पतंग बाजारात आलेले आहेत. चायना मेडचे पतंग देखील युवकांना भुरळ घालत आहेत. त्याच्या किंमती कमी असल्यामुळे त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा पतंगांवर कार्टून्सचे विविध पात्र तर आहेतच. एका पतंगाची किंमत किमान दोन रुपये तर जास्तीत जास्त २५ रुपये आहे. त्यामुळे पतंग विक्रीतूनच किमान दोन ते अडीच लाखांपर्यंत उलाढाल होत असते. यंदा मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Nylon cats are also doing so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.