कुपोषणामुक्तीला मिळतोय ‘पोषण परसबागांचा बुस्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:13 IST2019-04-14T12:13:01+5:302019-04-14T12:13:07+5:30
भाजीपाल्याने बहरल्या अंगणवाड्या : मोलगी केंद्र राज्यात प्रथम

कुपोषणामुक्तीला मिळतोय ‘पोषण परसबागांचा बुस्टर’
नंदुरबार : १७ मे २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्घाटन झालेल्या मोलगी ता़ अक्कलकुवा येथील पोषण पुनवर्सन केंद्रास दोन वर्षे पूर्ण होणार आहेत़ दोन वर्षात ३१५ बालकांना कुपोषणमुक्त करणाऱ्या या केंद्राचा परसबाग उपक्रम सातपुड्यात रुजत असून यातून कुपोषण समूळ नष्ट होण्यासाठी मदत होत आहे़
संयुक्त राष्ट्र संघाने प्रत्येकाच्या अन्नात सात घटक असावेत असे निर्धारित केले आहेत़ सातपुड्यात नेमक्या याच बाबींची कमी असल्याने कुपोषण ही समस्या स्वातंत्र्यानंतरही मूळ धरुन आहे़ या मुळावर घाव घालण्यासाठी कुपोषित बालक आणि त्याचे आईवडील यांचे पूर्ण पोषण व्हावे असा प्रयत्न युनिसेफच्या माध्यमातून मोलगी येथील पोषण पुनवर्सन केंद्रात केला जात आहे़ यात प्रामुख्याने पोषण परसबाग हा उपक्रम दोन वर्षापासून हाती घेतला जात असून यांतर्गत येथे २१ दिवस दाखल राहणाºया बालकांच्या मातांना भाजीपाला लागवड, भाजीपाला शिजवून खाण्याबाबत मार्गदर्शन केले होते़ येथील परसबागेत जीवनसत्त्व, मायक्रोन्यूट्रीयंस, हिमोग्लोबिन आणि इतर खनिजांनी युक्त असा शेवगा, मेथी, कोथंबिर, टमाटे, गिलकी, दोडकी, वांगे, पालक, गवार, भेंडी, कडीपत्ता, लिंबू, पपई, सिताफळ, फुलकोबी, पाणकोबी, कारले, पोकळा, आंबाडी आणि भोपळा याची उत्पादन पालकांकडून घेतले जाते़ येथे राहून भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण घेतलेले पालक घरी जाऊन परसबागा फुलवत आहेत़ यातून गत दोन वर्षात सातपुड्यातील १०० घरांच्या परसबागा ह्या चांगल्या प्रकारे तयार होऊन कुपोषण हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहेत़ केवळ घरांपुरते मर्यादित न राहता धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ११० अंगणवाडी सेविकांनी येथून भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण घेत उत्पादन सुरु करुन अमृत आहारात त्याचा समावेश केला आहे़ मोलगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ बागुल यांच्यासह आहारतज्ञ वर्षा पावरा याठिकाणी सातत्याने बालकांच्या पोषणबाबत मार्गदर्शन करत आहेत़ दोन वर्षे पूर्ण होण्यास महिन्याचा कालावधी शिल्लक असलेल्या मोलगी पोषण पुनवर्सन केंद्रात आजअखेरीस ९० बालकांवर उपचार सुरु आहे़ मे २०१७ पासून याठिकाणी ३११ कुपोषित बालके दाखल करण्यात आली होती़ त्यातील २३४ बालकांची प्रकृती सुदृढ करुन परत पाठवले गेले होते़ तर ३४ बालकांना इतरत्र हलवण्यात आले़ गत २१ महिन्यात याठिकाणी एकही बालक दगावलेले नसल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे़ बालकांच्या पोषणासाठी भाजीपाला लागवड आणि तो शिजवण्याची प्रात्यक्षिके होत असल्याने पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत आहे़ राज्यात पोषण परसबाग असलेले मोलगी हे एकमेव केंद्र आहे़ बालकांच्या पोषणात कोणतीही तडजोड न करता सुरु असलेल्या कामामुळे अनेक पालक उपचारासाठी त्यांच्या मुलांची आधी नोंदणी करुन ठेवत असल्याची माहितीही समोर आली आहे़