जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या होतेय ‘चौपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:12+5:302021-06-10T04:21:12+5:30
नंदुरबार- जिल्ह्यातील कुपोषणाबाबत प्रशासनाच्या पातळीवर ‘आलबेल’ असले तरी प्रत्यक्षात मात्र ते ‘चौपट’ होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नावावर गाफिल ...

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या होतेय ‘चौपट
नंदुरबार- जिल्ह्यातील कुपोषणाबाबत प्रशासनाच्या पातळीवर ‘आलबेल’ असले तरी प्रत्यक्षात मात्र ते ‘चौपट’ होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या नावावर गाफिल राहिल्याने कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नुकतीच धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागांतील अंगणवाड्यांचे स्क्रीनिंग झाले असून त्यातून हे विदारक चित्र बाहेर आले आहे. गेल्यावर्षी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार उशिराने पोहोचल्याने त्याचे गंभीर परिणाम दिसून आले होते. त्यावेळी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने केलेल्या स्क्रीनिंगमध्ये कुपोषित बालकांची संख्या पाचपटीने वाढली होती. ही संख्या या वर्षाच्या मेअखेर नियंत्रणात आणल्याचा प्रशासनाचा दावा होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने पावसाळ्यापूर्वी स्क्रीनिंग करण्यास विलंब झाल्याची तसेच कुपोषीत बालकांसाठी असलेले पोषण पुनर्वसन केंद्र बंद झाल्याचे वृत्त देताच प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. त्यानुसार १ ते ६ जून या काळात धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांमधील अंगणवाड्यांचे स्क्रीनिंग सुरू केले. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील ४१ आणि धडगाव तालुक्यातील ९३ अंगणवाड्यांचे स्क्रीनिंगचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातही १८ अंगणवाड्यांचे काम अपूर्ण आहे. ज्या अंगणवाड्यांचे स्क्रीनिंग करण्यात आले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अती तीव्र कुपोषित व कुपोषित बालके आढळून आली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एकूण १३४ अंगणवाड्यांमधील ११ हजार ६९६ बालकांचे स्क्रीनिंग करण्याचे पहिल्या टप्प्यात उद्दिष्ट होते. त्यापैकी आठ हजार ४४८ बालकांचे स्क्रीनिंग झाले असून त्यात २४७ अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली असून एक हजार १६ मॅम अर्थात मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत. त्यात अनेक अंगणवाड्यांमध्ये ही संख्या गंभीर असल्याचे दिसून आले आहे. नर्मदा काठावरील गमन अंगणवाडीत सर्वाधिक म्हणजे १५ अतितीव्र कुपोषित बालके आढळली आहेत तर ४८ मॅम बालके आहेत.
जिल्ह्यात एकूण २४४० अंगणवाड्या असून त्यांचे स्क्रीनिंग अद्याप बाकी आहे. गेल्यावर्षी स्क्रीनिंगनंतर या अंगणवाड्यांमध्ये तीन हजार ७१० अतितीव्र कुपोषित व सुमारे १६ हजारांहून अधिक मॅम बालके आढळली होती. वर्षभर उपचारानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या मे महिन्याचा अहवाल पाहिल्यास जिल्ह्यात ८४४सॅम व ८,३५६ मॅम बालके आहेत. अर्थात एकूण बालकांमध्ये सॅमची टक्केवारी ०.४८ तर मॅमची टक्केवारी ४.७६ टक्के आहे. नुकत्याच गेल्या आठवड्यात झालेल्या स्क्रीनिंगमध्ये हीच टक्केवारी जवळपास सहापटीने वाढल्याचे चित्र आहे. या स्क्रीनिंगमध्ये सॅमची टक्केवारी २.९९ आहे तर मॅमची टक्केवारी १२.०३ आहे. यावरूनच जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे.
पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार व्हावा
कोरोनामुळे बंद झालेले पोषण पुनर्वसन केंद्र सुरू केल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी अद्याप नवापूर आणि नंदुरबार तालुक्यातील पोषण पुनर्वसन केंद्रातच बालके दाखल झाली आहेत. मोलगी, धडगाव आणि तळोदा येथील केंद्रांवर अद्याप बालके नाहीत. तळोदा येथील केंद्रात बालके दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. पण ज्या भागात गंभीर स्थिती आहे त्या दुर्गम भागातील पोषण पुनर्वसन केंद्रावरच सर्व बालकांचा उपचार करण्याची गरज आहे.