आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:25+5:302021-06-09T04:38:25+5:30
कोरोना उतरणीला लागल्याने शाळेच्या घंटा वाजण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा कालांतराने काही दिवस सुरूही ...

आता प्रतीक्षा शाळेची घंटा वाजण्याची
कोरोना उतरणीला लागल्याने शाळेच्या घंटा वाजण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा कालांतराने काही दिवस सुरूही झाल्या होत्या. परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आल्या होत्या. या वर्षीही फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागले होते. मार्चमध्ये त्याचे प्रमाण दुप्पट तर एप्रिलमध्ये चार ते पाच पट वाढले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या व ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या आशा पूर्णत: मावळल्या होत्या. सद्य:स्थितीत कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून, कोरोनाचा प्रादुर्भावही कमी कमी होऊ लागल्याचे चित्र आहे.
नवीन रूग्णसंख्येतील घट आणि कोरोनामुक्तीचा वाढता टक्का याचे सातत्य असेच राहिले तर शाळांची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनानेही निर्बंध सैल केल्याने बच्चे कंपनी अर्थात सर्व वयोगटातील विद्यार्थीही शाळेसाठी आसुसले असून, त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जून महिन्याच्या १५ तारखेपासून साधारणपणे सर्व शाळा सुरू होतात. अजूनही कोरोनाचे सावट असल्याने त्याची तीव्रता अजून कमी झाली तर जरा उशिरानेही शाळा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यासह पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली असून, काहींनी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास मिळालेल्या परवानगीनंतर सुरू झालेल्या दुकानांमधून साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती.
जिल्हा अनलॉक झाल्यामुळे शैक्षणिक आणि स्टेशनरी साहित्याच्या दुकानांवर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शाळेबाबत अद्याप शासन स्तरावर काहीच हालचाल नाही. परंतु कोरोना आटोक्यात आल्यावर विचार होईलच याची खूनगाठ बांधत बच्चे कंपनीसह पालकवर्गही तयारीत आहेत.