आता विद्यार्थ्यांच्या माथी आॅनलाईन स्पर्धांचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:28 PM2020-03-29T12:28:27+5:302020-03-29T12:28:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे मुलं घरी बसून कंटाळू नये, त्यांनी आपल्या आवडत्या विषयातील ...

Now the stress of online competition over students | आता विद्यार्थ्यांच्या माथी आॅनलाईन स्पर्धांचा ताण

आता विद्यार्थ्यांच्या माथी आॅनलाईन स्पर्धांचा ताण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे मुलं घरी बसून कंटाळू नये, त्यांनी आपल्या आवडत्या विषयातील अ‍ॅक्टीव्हिटी कायम ठेवावी आणि त्यांच्या अंगभूत कलागुणांचा विकास व्हावा यासाठी आता शाळांनी आणि संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अ‍ॅक्टीव्हिटी वाढतील आणि पालकांनाही त्यांच्याकडून तयारी करवून घेण्यासाठीचा वेळ भरून काढता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.
गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेले लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे मुलं घरातच बसून आहेत. शाळा, क्लासेस नसल्याने गृहपाठ नाही, परीक्षा होणार नसल्याने गृहपाठ नाही. यामुळे मुलं घरातल्या घरात बैठे खेळ खेळून कंटाळले आहेत. यामुळे त्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता काही शाळांनी विद्यार्थ्यांकडून घरात बसूनच आॅनलाईन स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. कुठेही बाहेर न निघता घरात बसूनच या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.
कशी असेल स्पर्धा
शुद्धलेखन, वाचन, निबंध, कविता, चित्रकला, घरगुती प्रयोग, नृत्य, गायन, वादन आदी स्पर्धांचा यात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी चित्र काढल्यानंतर, निबंध, कविता, शुद्धलेखन लिहिल्यानंतर त्या कागदाचा फोटो काढून तो दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. तसेच नृत्य, गायन, वादन यासह इतर स्पर्धांचा देखील एक ते तीन मिनिटांचा व्हिडीओ करून तो आयोजकांच्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावयाचा आहे. त्यानंतर दिलेल्या ठराविक तारखेला निकाल जाहीर केला जाईल. परिस्थिती सामान्य झाली तर जाहीर कार्यक्रम घेवून विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.
विविध वयोगटात आणि वर्गनिहाय या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे.
घरगुती अभ्यास
याशिवाय काही शाळांनी घरगुती अभ्यास देखील विद्यार्थ्यांना दिला आहे. आधीच विद्यार्थ्यांच्या त्या त्या वर्गातील पालकांचे व्हॉट्सअप गृप आहेत. त्याचे अ‍ॅडमिन वर्गशिक्षक आहेत. अशा गृपवर संबधीत शाळांच्या सुचनेनुसार वर्गशिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठ देत आहेत. तो गृहपाठ पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यावर तपासला जाणार आहे. हा गृहपाठ पुढील वर्गाचा अर्थात आता विद्यार्थी पाचवीला असेल तर सहावीच्या वर्गाच्या तयारीच्या दृष्टीने दिला जात आहे.
संस्थाही सरसावल्या
अशा स्पर्धा घेण्यासाठी शाळांप्रमाणे संस्थाही सरसावल्या आहेत. काही संस्थांनी चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित केली आहे. त्याची माहिती विविध व्हॉट्सअप गृप आणि फेसबूकवरून दिली जात आहे.

एक ना धड भाराभर चिंध्या असे नको... आता एकाने आॅनलाईन स्पर्धा सुरू केल्याचे म्हटल्यावर त्याचे अनुकरण अनेकजण करण्याची शक्यता आहे. शाळांचा अभ्यास व स्पर्धा ठिक आहे. परंतु आता स्पर्धांचा बडीमार होणार असल्याने विद्यार्थ्यांचे, बालकांचे बालपण, त्यांच्या सुट्टयांचा कालवधी हिरावला जावू नये अशी अपेक्षाही काही पालकांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

Web Title: Now the stress of online competition over students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.