शहादा तालुक्यातील ९४७ शेतकऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:30 IST2020-11-15T12:30:22+5:302020-11-15T12:30:30+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  व्यवसायाने शेतकरी आहेत मात्र आयकर भरत असल्याने केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान ...

Notice to 947 farmers in Shahada taluka | शहादा तालुक्यातील ९४७ शेतकऱ्यांना नोटिसा

शहादा तालुक्यातील ९४७ शेतकऱ्यांना नोटिसा

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  व्यवसायाने शेतकरी आहेत मात्र आयकर भरत असल्याने केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील ६५१ व  एकाच  कुटुंबातील दोघे तसेच विविध कारणाने अपात्र ठरलेल्या २९६ अशा एकूण ९४७ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने घेतलेले अनुदान परत करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सुमारे ७६ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान घेतलेले असून त्यांनी ते शासनाकडे जमा करावे, असे नोटिसीत म्हटले असून यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. पाच एकरपेक्षा कमी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. योजनेच्या निकषाप्रणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थींपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी येथील तहसील प्रशासनास प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत तालुक्यातील ३१ हजार २७० शेतकरी पात्र ठरले होते. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तहसील कार्यालयामार्फत या योजनेअंतर्गत अनुदान जमा करण्यात आले. मात्र या योजनेचा लाभ घेताना जे शेतकरी आयकर भरतात व एकाच कुटुंबातील दोघांनी योजनेचा लाभ घेतला त्याचप्रमाणे जे शेतकरी या योजनेसाठीी पात्र नाहीत मात्र त्यांनी अनुदान घेतले आहे, असे शहादा तालुक्यात एकूण ९४७ शेतकरी प्रशासनाला फेरतपासणीत आढळून आले आहेत.
याबाबत या ९४७ शेतकऱ्यांनी अनुदानाच्या रकमा परत करण्याविषयी गावोगावच्या तलाठ्यांना अपात्र शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. तलाठ्यांकडून अपात्र शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. धनादेशाद्वारे तहसील कार्यालयात या रकमा जमा कराव्यात, अशी सूचना करण्यात आली असून  काही शेतकऱ्यांनी अशा नोटिसा मिळाल्याचे  सांगितले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत मिळालेले अनुदान परत करण्याबाबत तहसील कार्यालयामार्फत नोटीस मिळाल्यानंतर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली असून काही शेतकऱ्यांनी नोटीस मिळताच तात्काळ घेतलेल्या अनुदानाची  रक्कम तहसील कार्यालयाच्या बँक खात्यावर जमा करून संभाव्य कारवाईपासून सुटका केली आहे. जे शेतकरी सदर अनुदान परत करणार नाही अशांंवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही ज्या लाभार्थ्यांना मानधन दिले, त्यांची नावे तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहेत. तलाठ्यांमार्फत या रक्कमेची वसुली सुरू आहे. संबंधितांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. अपात्र लाभार्थ्यांनी रक्कमेचा परतावा करावा अन्यथा प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा, जि. नंदुरबार
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, विविध कारणांमुळे नुकसान झाल्यास राज्य शासनामार्फत नुकसान भरपाई मिळते. यासाठी तहसील कार्यालयाकडे आमचा सातबारा उतारा, गट क्रमांक, बँक खाते नंबर जमा केलेला असतो. अशी यादी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांमार्फत तहसीलदार कार्यालयाकडे असते. याच खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान जमा झाले आहे आम्ही आयकर भरत असल्याने आम्ही या योजनेसाठी अपात्र आहोत हे आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर माहिती झाले. आम्ही तात्काळ सदर अनुदानाची रक्कम तहसीलदारांच्या खात्यावर नियमानुसार जमा करणार आहोत.
-चतुरसिंग राजपूत,  शेतकरी, शहादा.
 

Web Title: Notice to 947 farmers in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.