लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धडगाव तालुक्यातील निगदी येथील 300 मजुरांनी समतलचर काम केले आहे. परंतु संबंधीताने या मजुरांना अजूनही मजुरी अदा केली नाही. वनविभागाच्या अधिका:यांनी याप्रकरणी चौकशी करून शासकीय दराप्रमाणे मजुरी मिळवून देण्याची मागणी केली आहे.राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धडगाव तालुक्यातील साधारण 300 मजुरांनी त्यांच्या निगदी गावात समतलचरांचे काम केले आहे. त्यांनी साधारण 10 हजार मीटरचे समतलचरचे काम 20 एप्रिलला सुरू करून 10 ते 12 दिवसातच पूर्ण केले आहे. तथापि संबंधी ठेकेदाराने अद्यापर्पयत केलेल्या कामाची मजुरी अदा केलेली नाही. आम्ही मजुरी मागण्यासाठी जातो तेव्हा कमी दराने मजुरी देण्याचे म्हणतो. वास्तविक आम्हास शासकीय दराने केलेल्या कामाची मजुरी मिळणे आवश्यक असतांना त्याप्रमाणे मजुरी देण्यास नकार दिला जात आहे. यासाठी त्यांच्याकडे सातत्याने हेलपाटे मारत असल्याचेही मजुरांनी सांगितले. त्याबरोबर याच योजनेतून 22 जाळीबांध कामदेखील आम्हास देण्याचे ठरले होते. मात्र हे काम सुद्धा गावातील मजुरांना सोडून दुस:यांना दिले आहे. आम्ही वेळोवेळी संबंधीत ठेकेदारास एकूण काम किती झाले आहे. त्यावर शासकीय दरानुसार किती मजुरी झाली आहे. याबाबत समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उडवा-उडवी व अरेरावाची भाषा करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.हे काम वनविभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे वनविभागाच्या अधिका:यांकडेदेखील प्रत्यक्ष भेटून तक्रार केली आहे. मात्र संबंधीत अधिका:यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष घातले नसल्याचे मजूर सांगतात. सद्या पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे पुढील रब्बी हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करण्याकरीता पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याप्रकरणी चौकशी करून आम्हास शासकीय दरानुसार मजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी जयसिंग पावरा, शांतीलाल पावरा, भानुदास पावरा, खेमा पावरा, कल्पेश पावरा, वीरसिंग पावरा, दिनेश पावरा, गुलाबसिंग पावरा, जयमल पावरा, गणेश पावरा, इंदास पावरा, दिनेश पावरा, गुलाबसिंग पावरा, रवींद्र पावरा, भिका पावरा, चंपालाल पावरा, नटवर पावरा, तेरसिंग पावरा, शिवाजी पावरा आदींनी केली आहे. दरम्यान याबाबत या मजुरांनी वनविभागाचे वनक्षेत्रपाल पिंगळे यांनाही निवेदन दिले आहे.
जलयुक्त शिवाराच्या कामाची मजुरी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:52 IST