गाड्या रिकाम्या तरी आरक्षण कोणी करेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:43+5:302021-06-16T04:40:43+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे उधना-जळगाव मार्गावरील व्यस्त स्थानक असलेल्या नंदुरबार येथे सध्या शुकशुकाट आहे. सप्ताहात ४० रेल्वेगाड्या या ठिकाणी धावत ...

गाड्या रिकाम्या तरी आरक्षण कोणी करेना
नंदुरबार : कोरोनामुळे उधना-जळगाव मार्गावरील व्यस्त स्थानक असलेल्या नंदुरबार येथे सध्या शुकशुकाट आहे. सप्ताहात ४० रेल्वेगाड्या या ठिकाणी धावत आहेत. परंतु, असले तरीही आगावू आरक्षणाला मात्र प्रतिसादच नसल्याचे दिसून आले आहे.
नंदुरबार रेल्वेस्थानकातून गुजरात व दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. यातून येथून त्या-त्या गाड्यांसाठी आरक्षण मिळविणे कठीण जाते. परंतु गेल्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलली असून, बुकिंग केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आरक्षण मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वच प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करणारे केवळ महत्त्वाच्या कामासाठीच प्रवास करीत असल्याने आरक्षण वेळीच मिळत असल्याची माहिती आहे.
‘नवजीवन’ला प्रतिसाद
अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेसला सध्या सर्वाधिक पसंती आहे. चार राज्यांतून जाणाऱ्या गाडीतून व्यापारी व पर्यटक प्रवासाला अधिक पसंती देतात.
एसीचे आरक्षण सहज
हावडा-अहमदाबाद, ताप्तीगंगा, तसेच इतर गाड्यांचे आरक्षण हे सहज मिळत असल्याचे सांगण्यात आले. यातही एसीचे आरक्षण तातडीने होत असल्याचे सांगण्यात आले.
नंदुरबार येथून सूरतकडे येणारे व जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. परंतु, सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गुजरात राज्यात स्थिरस्थावर झालेले अनेकजण उन्हाळ्यात गावी येतात. परंतु, यंदा मात्र कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने गुजरातमधून अनेकजण आलेच नव्हते. यामुळे मार्गावरची प्रवासी संख्या कमीच आहे.
पॅसेंजर गाड्यांचा प्रतिसाद
सद्य:स्थितीत उधना-जळगाव रेल्वेमार्गावर एक मेमो रेल्वे चालविण्यात येत आहे. यातून मोजकेच प्रवासी प्रवास करतात.
सोबत भुसावळ ते ब्रांद्रा ही खान्देश एक्स्प्रेसही बंद आहे. यातून मार्गावरची प्रवासी संख्या ही मर्यादित झाली आहे.
गुजरात राज्यात जाणारे व येणारे प्रवासी यांना पॅसेंजर गाड्यांचा मोठा आधार होता. परंतु, या गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.