नऊ मतदान केंद्रांवर नर्मदेच्या अथांग पाण्यातून जावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:27 IST2019-04-14T20:26:55+5:302019-04-14T20:27:31+5:30
दुर्गम भागातील मतदान केंद्र : एक दिवस आधी निघणार कर्मचारी

नऊ मतदान केंद्रांवर नर्मदेच्या अथांग पाण्यातून जावे लागणार
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील नऊ मतदान केंद्रांवर सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्ज अर्थात बोटीद्वारे निवडणूक कर्मचाऱ्यांना जावे लागणार आहे. अशा ठिकाणी मोबाईल रेंज राहणार नसल्यामुळे पोलिसांच्या वायरलेस सेटचा वापर संपर्काचे माध्यम म्हणून राहणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके पुर्णपणे अतिदुर्गम भागातील आहेत. या तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक गावांमधील मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. अशा कर्मचाºयांना एक दिवस आधीच अशा केंद्रांवर मतदान साहित्यासह रवाना करावे लागते. नर्मदा काठावरील अनेक ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी इमारत अथवा ग्राम पंचायत कार्यालय नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड तयार करून मतदान केंद्र तयार करावे लागत आहे.
नर्मदा काठावरील नऊ मतदान केंद्रांमध्ये जाण्यासाठी निवडणूक कर्मचाºयांना थेट गुजरातमधील केवडीया कॉलनी येथे जावून तेथून सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्जद्वारे अर्थात शासनाच्या बोटीद्वारे संबधीत नऊ केंद्रांवर जावे लागणार आहे. नर्मदा काठावर उतरल्यावर संबधीत गावांमध्ये जाण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेवून त्यांच्यासोबत निवडणुकीचे साहित्य घेवून संबधीत मतदान केंद्रावर जावे लागणार आहे.
परतीचा प्रवास देखील तसाच राहणार असल्यामुळे मतदान झाल्यानंतर संबधीत साहित्य घेवून दुसºया दिवशी सकाळी संबधीत कर्मचारी मतदान यंत्र जमा करणार आहेत.
वायरलेस सेट संपर्काचे माध्यम
दुर्गम भागातील मतदान केंद्रात संपर्काचे साधन नसल्यामुळे अशा ठिकाणाहून तालुकास्तरावर किंवा जिल्हा मुख्यालयी संपर्क साधण्यासाठी पोलिसांच्या वायरलेस सेटची मदत घेतली जाणार आहे. गेल्या वेळी सॅटेलाईट फोनचा वापर करण्याचा प्रयोग झाला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे यंदा वायरलेस सेटचाच वापर करण्यावर भर राहणार आहे.