राजरंग-महाआघाडीच्या पक्षांना नवीन वर्ष उत्सुकतेचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 21:34 IST2021-01-10T21:34:33+5:302021-01-10T21:34:46+5:30
रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सध्या राजकारणातील अंतर्गत हालचाली गतीमान झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात नेते ‘क्वारंटाईन’ होऊन ...

राजरंग-महाआघाडीच्या पक्षांना नवीन वर्ष उत्सुकतेचे...
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सध्या राजकारणातील अंतर्गत हालचाली गतीमान झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात नेते ‘क्वारंटाईन’ होऊन आराम करीत असल्याने बसल्या बसल्या राजकारणातील डावपेच गुपीतपणे सुरू आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये केवळ चर्चा रंगत असूृन सर्वांचेच लक्ष नव्या घडामोडींकडे लागले आहे. विशेषत: काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी थांबल्याने त्याकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता लागून आहे.
सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये खरे तर नेत्यांना फारसा रस दिसून येत नाही. पण राज्यातील आघाडी सरकार टिकणार की जाणार या घडामोडींकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवत आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये काही मुद्यांवर तिन्ही पक्षांचे एकमत नाही. तोच धागा पकडत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. सध्या औरंगाबादचे नामकरणाच्या मुद्याची चर्चा जोर धरत असून त्यावरुन पक्षातील मतभेदांमुळे थेट मध्यावधी निवडणुकांपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. त्यातच राज्यपाल नियुक्त आमदारांची थांबलेली नियुक्ती, शरद पवारांचा संभाव्य दौरा आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदाची लांबलेली निवड हे मुद्दे मात्र राजकारणातील चर्चेचे वातावरण अधिक गरम करीत आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये नंदुरबारचे शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आहे. रघुवंशी यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही जिल्ह्यात अधिक आहे. तेवढाच राजकीय विरोधदेखील आहे. त्यामुळे दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही राज्यपालांनी अधिकृतपणे नावे घोषित न केल्याने समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तर विरोधी कार्यकर्ते मात्र वेगवेगळ्या चर्चेने संभ्रम निर्माण करीत आहेत. याच यादीत नंदुरबारशी नातेसंबंध असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचेही नाव असल्याने त्या चर्चेत अधिक भर पडत आहे. त्यामुळे राज्यपाल अधिकृत यादी कधी घोषित करतात त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र स्थानिक कार्यकर्ते पक्ष बांधणीला जोर देत आहेत. विविध आंदोलन व कार्यक्रमांमध्ये या पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रीय होताना दिसत आहेत. पण या उत्साहात पक्षाचे नेते शरद पवार यांचा स्थगित दौरा कधी होईल याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार यांच्या गेल्या २१ नोव्हेंबरला नंदुरबार जिल्हा दौरा जाहीर झाला होता. या दौऱ्यासंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गावपातळीवर प्रचार करून कार्यकर्त्यांना येण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे त्याच काळात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे भाकीतही करण्यात आले होते. त्यामुळे हा दौरा अधिक लक्षवेधी ठरला होता. मात्र तो ऐनवेळी स्थगित झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये हिरमोड आला होता. त्यामुळे दौरा पुढे होणार असल्याचे जाहीर केले होते. आता सर्वांचे लक्ष या संभाव्य दौऱ्याकडे आहे. एकीकडे राज्यातील आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही उत्सुकता असताना काँग्रेसला मात्र आपल्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्तीची उत्सुकता आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर मात्र सव्वा वर्षापासून हे पद रिक्तच आहे. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी मध्यंतरी इतर पदांची नियुक्ती केली. पण जिल्हाध्यक्षपदी मात्र कुणाचीही नियुक्ती न झाल्याने या पदावर कोणाची वर्णी लागेल याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. एकूणच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये याबाबतची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.