जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:33 IST2020-08-01T12:33:32+5:302020-08-01T12:33:41+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर ...

जिल्हा परिषदेच्या राजकारणाला नवे वळण
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या पाच महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राजकारणात सुरू असलेली खदखद अखेर शुक्रवारी झालेल्या खाते बदलाच्या निर्णयाने शमली आहे. तथापी या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणालाही नवे वळण मिळणार असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५६ पैकी भाजपचे २३, काँग्रेसचे २३ शिवसेनेचे सात तर राष्टÑवादीचे तीन निवडून आले आहेत. ही निवडणूक जेंव्हा झाली तेंव्हा जिल्ह्यातील राजकारण वेगळे होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर राज्यातील राजकारणही बदलले, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीचे सरकार सत्तेवर आले. सहाजिकच जि.प.ची सत्ता स्थापन करतांनाही त्याची अडचण आली. स्थानिक नेत्यांची गोची झाली. निवडणूकपूर्वी दिलेल्या आघाडीच्या वचनांचा भंग झाला. अशा स्थितीत हायकमांडच्या आदेशानुसार शिवसेना, काँग्रेसची युती होऊन नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन झाली. सभापती निवड करतांना पुन्हा नव्या राजकीय समिकरणाची आघाडी पहायला मिळाली.
सभापती निवडीत भाजपलाही एक जागा देण्यात आली. ही नवी आघाडी करताना काँग्रेसने शिवसेनेला काहीसे लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. सत्ता स्थापन करतांना शिवसेनेला उपाध्यक्षपद व बांधकाम सभापतीचे ज्या बहुचर्चीत आश्वासनाची चर्चा होती ती मात्र दिसली नाही. शिवसेनेला उपाध्यक्षपद दिले पण बांधकाम सभापतीपद काँग्रेसने आपल्याच कडे ठेवले. त्याबाबतची खदखद नंतर अनेक घटनेतून उमटली. अगदी सुरूवातीच्याच काळात कार्यालयाची भिंत पाडण्याचा वाद अधीक चर्चेत राहिला. अशा स्थितीत गेल्या दोन, तीन महिन्यांपासून जि.प.तील सभापती बदलाची चर्चेला ऊत आला होता.
दरम्यानच्या काळात पारनेर नगरपालिकेतील पाच शिवसेनेचे सदस्य राष्टÑवादीत प्रवेश केल्याची घटना घडली होती. राज्यातील महाआघाडीचा पक्षातच घडलेली ही घटना संपुर्ण महाराष्टÑात एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली. त्यामुळे लागलीच दोन्ही पक्षांनी आपली चूक सुधारून प्रवेश केलेल्या सदस्यांनी पुन्हा आपल्या मुळ पक्षात प्रवेश केला होता.
नेमका याच घटनेचा मुद्दा करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडे मांडून जिल्हा परिषदेत काँग्रेसने दिलेले आश्वासन न पाळल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे पक्ष स्तरावरून ही सुचना काँग्रेसलाही देण्यात आली. त्याच घडामोडीतून शुक्रवारच्या सभेतील खातेबदलाची प्रक्रिया झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.
नवीन खाते बदलामुळे आता बांधकाम सभापतीपद उपाध्यक्ष राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आले आहे. तर त्यांच्याकडील कृषी व पशुसंवर्धन खाते अभिजीत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.
खाते बदलाच्या या निर्णयावर अनेक खलबत्ते होत राहणार त्याबाबत वेगवेगळी चर्चाही होईल, तर्क काढले जातील. पण या निर्णयाने जिल्ह्यातील एकुणच राजकारणावर एक वेगळा परिणाम होण्याचे चित्र आहे, विशेषत: नव्या पिढीतील युवा नेत्यांमध्ये जिल्ह्यात सुरू असलेली चढाओढीची स्पर्धा यातून अधीक गडद झाल्याचे स्पष्ट आहे.