कोरोनाबाधीतच्या मृतदेहाची ना आदलाबदल ना हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 12:32 PM2020-09-06T12:32:28+5:302020-09-06T12:32:38+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार सिव्हीलच्या न्यायवैद्यक विभागाने नंदुरबार मेड ‘लीक फ्रूफ बॉडी बॅग’ची केलेली ...

Neither exchange nor care of the corpse of the corona | कोरोनाबाधीतच्या मृतदेहाची ना आदलाबदल ना हेळसांड

कोरोनाबाधीतच्या मृतदेहाची ना आदलाबदल ना हेळसांड

Next


मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार सिव्हीलच्या न्यायवैद्यक विभागाने नंदुरबार मेड ‘लीक फ्रूफ बॉडी बॅग’ची केलेली निर्मिती आणि नव्याने तयार केलेला ‘टेम्पररी होल्डींग एरिया’ या उपाययोजनांमुळे कोरोनाबाधीत मृतदेहांची आदलाबदल झालेली नाही, मृतांच्या नातेवाईकांना देखील मृतदेहाचे मुखदर्शन करता येते. आतापर्यंत कोरोनाचे ८१ व कोरोना संशयीत १३० अशा २११ जणांना याप्रकारे अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. यामुळे मृतांच्या नातेईकांनाही दु:खाच्या सावटात समाधानाची झुळूक अनुभवण्यास मिळत आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना बाधीत व्यक्तींच्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नातेवार्इंकाना मन:स्ताप देखील सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी पैसा आणि वेळ देखील यामुळे वाया जात आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात न्यायवैद्यक विभागाने केलेले योग्य नियोजन आणि काही स्थानिक उपाययोजना यामुळे दु:खात असलेल्या नातेवाईकांना समाधान मिळत आहे.
कोरोनाबाधीत मृतदेहाला नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात नाही. त्याची शास्त्रीय पद्धतीने पॅकींग केली जाते. त्यासाठी बहूतेक ठिकाणी बाजारात मिळणाऱ्या बॉडी बॅगचा वापर केला जातो. ती बॅग पुर्णत: बंदीस्त असते. त्यामुळे आतील मृतदेह कुणाचा हे नातेवाइकांना समजत नाही. परंतु नंदुरबारात आधीपासूनच बाजारातील बॅगेचा वापर केला गेला नाही. त्यासाठी स्थानिक ठिकाणीच लीक फ्रूफ बॉडी बॅग तयार केली जात आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असलेले साहित्य वापरले जात आहे. त्यात चेन, साधी पन्नी आणि खताच्या गोणीसाठी वापरली जाणारी जाड पन्नी, पट्टी, दोरा, प्लॅस्टिकचा जाड पारदर्शी कागद यांचा समावेश असतो. गावातील उपलब्ध असलेल्या टेलर कडून ही बॅग शिऊन घेतली जाते. साधारणत: चार लेअरमध्ये ती बॅग असते. मृतदेहाचा चेहरा दिसावा यासाठी त्या ठिकाणी पारदर्शी प्लॅस्टिक कागद शिवला जातो. यामुळे नातेवाईकांना मुखदर्शन घेता येते. तशी सोय जिल्हा रुग्णालयातच केली जाते. त्यानंतर दोन नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालय, पालिकेचे कर्मचारी मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेतात. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित पाचही जणांना पीपीई किट घालणे अनिवार्य असते.
लिक फ्रूफ बॉडी बॅग एकावेळी २० ते २५ संख्येने उपलब्ध राहील याची दक्षता घेतली जाते. ही बॅग बाजारात साधारणत: ८०० ते १२०० रुपयांना मिळते. परंतु स्थानिक ठिकाणी तयार केली जात असल्याने ती केवळ ४५० ते ५५० रुपयात बनवून घेतली जाते.
नंदुरबारातील कोरोनाबाधीत व संशयीतांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जुन्या स्मशानभुमिचा वापर केला जातो. तेथे तीन स्टॅण्ड तयार करण्यात आले आहेत. २४ ते ३६ तासात एका स्टॅण्डमध्ये एकाच मृतदेहाचा अंत्यसंस्कार केला जातो.
एकुणच राज्यभरात मृतेदहांची आदलाबदल, मुखदर्शन करू न देण्याची सोय त्यांची हेळसांड, अंत्यसंस्कारासाठीची वेटींग अशा समस्या असतांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाने मात्र या सर्व बाबींवर उपाय शोधून घेतले आहेत.
टेम्पररी होल्डींग एरिया... उपचार घेतांना कोरोना बाधीत किंवा संशयीताचा मृत्यू झाल्यास व नातेवाईकांना येण्यास किंवा अंत्यस्काराला वेळ लागणार असल्यास टेम्पररी होल्डींग एरिया तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एक हॉल तयार करून त्यात तीन बेड व एक कोल्डस्टोरेज ठेवण्यात आले आहे. संबधीताचा मृत्यू झाल्यानंतर लागलीच बेडवरून त्यांना या ठिकाणी बॉडीबॅगमध्ये पॅक करून ठेवले जाते. मृतदेहासह त्याच्याजवळील सर्व सामान देखील ठेवला जातो. नातेवाईक आल्यावर सर्व सामान ताब्यात घेतात. मृतदेहाची खात्री पटविली जाते. त्यानंतर एका छापील फॉर्मवर नातेवाईकाची सही करून घेतली जाते. यामुळे वस्तू हरविण्याच्या तक्रारी किंवा मृतदेह आदलाबदल होण्याचा संभव राहत नाही असे न्यायवैद्यक अधिकारी डॉ. आर.ए.थोरात यांनी सांगितले.
 

Web Title: Neither exchange nor care of the corpse of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.