कुऱ्हावद ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:29+5:302021-06-04T04:23:29+5:30
नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुऱ्हावद तर्फ सारंगखेडा येथे माजी सरपंच, ग्रामसेविका व ठेकेदार यांनी मिळून पदाचा गैरवापर करत आर्थिक ...

कुऱ्हावद ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष
नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुऱ्हावद तर्फ सारंगखेडा येथे माजी सरपंच, ग्रामसेविका व ठेकेदार यांनी मिळून पदाचा गैरवापर करत आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार प्रशासनाकडे निवेदनाद्वारे फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती. यातून कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, परंतु गेल्या चार महिन्यांत याठिकाणी कार्यवाहीच झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कुऱ्हावद तर्फ सारंगखेडा ग्रामपंचायतीत २०२० - २१ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत सदस्यांची कोणतीही सभा अथवा मंजुरी नसताना नियमबाह्य पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. सप्टेंबर २०२०पासून ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त असल्याने कर्मचारी वेतन, रोगराई, पाणी बिले आदी अदा करताना माजी सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांनी एकत्र येऊन निधीचा गैरवापर केल्याचे ग्रामस्थांनी ग्रामविकास विभागाकडे पुराव्यासह सादर केले होते. दरम्यान गावात बांधकाम सुरू असलेल्या व्यायामशाळा बांधकामावर ७० ते ८० हजार रुपये खर्च झाला असताना प्रत्यक्षात ठेकेदाराला चार लाख रुपये अदा करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला होता. यातून चाैकशीची मागणी करत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र चार महिने उलटूनही कार्यवाही झालेली नाही. यातून गुरुवारी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामविकास विभाग) यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी पदाचा गैरवापर केल्याचे समोर येऊनही तालुका प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने या प्रकरणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.