माणूस म्हणून जगायला शिकण्याची गरज-ॲड. के. सी. पाडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:53+5:302021-07-25T04:25:53+5:30
कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, ...

माणूस म्हणून जगायला शिकण्याची गरज-ॲड. के. सी. पाडवी
कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, नवापूर पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, अजित नाईक, रूपसिंग पाडवी, कुंदाबाई नाईक, दिलीप नाईक, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. पाडवी यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाह करणाऱ्या युवक-युवतींनी समाजासमोर आदर्श प्रस्तुत केला आहे. शासनाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. राज्यघटनेला सर्वोच्च स्थानी मानून समाजात समानता आणि एकता स्थापन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. भारतीय संस्कृतीत माणुसकीच्या तत्त्वाला सर्वाधिक महत्त्व आहे. आंतरजातीय विवाहात माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करण्याची भावना असल्याने अशा दाम्पत्यांचे सहजीवन इतरांना प्रेरणा देणारे आणि समाजात जातीय सलोखा निर्माण करणारे ठरेल, असे त्यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांचे सामंजस्याने मतपरिवर्तन करणे किंवा घरातून विरोध असतानाही लग्नानंतर आई-वडिलांचा सन्मान करून त्यांच्याकडे लक्ष देणे या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाहामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यास मदत होईल. देशात एकात्मता स्थापन करण्यासाठी अशा विवाहांना प्रोत्साहन देणारी ही चांगली योजना आहे. माणूस म्हणून जोडीदाराला स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले की, आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी मुलगा किंवा मुलगी असा भेद न मानता एक किंवा दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी. मुलासारखेच मुलीलाही चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. आंतरजातीय विवाहामुळे समाज सुदृढ होईल आणि जातिभेद नष्ट होण्यास मदत होईल. प्रास्ताविकात श्री. नांदगावकर यांनी योजनेविषयी माहिती दिली. यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तीन दाम्पत्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ३० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.