गोमाई नदीवरील पुलाखालील खड्डे बुजविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST2021-06-26T04:21:50+5:302021-06-26T04:21:50+5:30
सुमारे ३५ वर्षांपूर्वी शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पात्रात हा पूल बांधण्यात आलेला आहे. भादे, पाडळदे, परिवर्धे, औरंगपूर, तिखोरा ...

गोमाई नदीवरील पुलाखालील खड्डे बुजविण्याची गरज
सुमारे ३५ वर्षांपूर्वी शहादा-पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्या पात्रात हा पूल बांधण्यात आलेला आहे. भादे, पाडळदे, परिवर्धे, औरंगपूर, तिखोरा आदी ३० ते ४० गावांतील वाहनधारक या पुलावरून ये-जा करतात. गोमाई नदीला आलेल्या पुरामुळे अनेकवेळा पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला भराव वाहून गेल्याने अनेकवेळा दुरुस्ती केली. १५ ते २० वर्षांपासून पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहन चालक जीव मुठीत धरून पुलावरून आपले वाहन चालवतात. या पुलावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आलेले आहेत. एवढ्या अपघाताच्या घटना होऊनही संबंधित विभागाकडून अद्याप पुलाला कठडे लावण्यात आलेले नाहीत.
या पुलाच्या खाली सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच-सहा वर्षांपूर्वी बेड काँक्रिट केले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा कमी होऊन दुसऱ्या बाजूला पाणी थांबून राहील हा उद्देश आहे. या पाण्यामुळे कूपनलिकांची पाणी पातळी टिकून गुराढोरांना व नदीकाठावर असलेल्या वसाहतीतील लोकांना कपडे वगैरे धुण्यासाठी पाणी उपयोगी पडेल हे नियोजन होते. काँक्रिट केलेल्या ठिकाणी सद्यस्थितीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. याठिकाणी गेल्या तीन वर्षात दोन ते तीन युवकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या पावसाळ्यातही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन ते खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
गोमई नदीपात्रात करण्यात आलेल्या बेड काँक्रिटीकरणास पाच ते सात फुटाचे खड्डे झालेले आहेत. त्यात पाणी भरल्याने खेळणाऱ्या मुलांना ते दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर अंघोळीसाठी येणारे मुले आनंद लुटतात. अशावेळी दुर्घटना घडू नये म्हणून संबंधित विभागाने त्वरित बेड काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवावेत.
-इरफान पठाण, शहादा.