पावसाळ्यापूर्वी साफसफाईची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:57 IST2020-05-27T12:57:07+5:302020-05-27T12:57:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत ...

पावसाळ्यापूर्वी साफसफाईची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी मोठ्या गटारी व नाल्यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.
शहरातील प्रमुख भागात असलेल्या मोठ्या गटारांमधील पाण्याचा पावसाळ्यात सुरळीतपणे निचरा होत नसल्याने रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच या पाण्यामुळे डबके साचून डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो व आरोग्याचाही प्रश्न उद्भवतो. डोंगरगाव रस्ता, पालिका प्राथमिक शाळा क्रमांक नऊ व १६, दोंडाईचा रस्ता, कलंदर शहा बाबा दर्गा, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार या भागात नेहमी पाणी शिरते व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पालिकेने डोंगरगाव रस्त्यालगत पालिका प्राथमिक शाळेलगत, दोंडाईचा रस्ता, पुरुषोत्तम मार्केट व नवीन भाजीपाला मार्केटला लागून असलेल्या गटारींची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. या गटारी व नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे निघत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरुन गरीब कुटुंबांचे नुकसान झाले होते.
शहरातील शिवसेना कार्यालय, न्यायालय ते हॉटेल पटेल रेसिडेन्सी चौकजवळ असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर घाण व गाळ साचल्याने या नाल्यांमधून नेहमी दुर्गंधी येते. यामुळे या मुख्य रस्त्यावर प्रवास करणाºया नागरिकांना नेहमी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही लोकांनी घरातले घाण पाणी या नाल्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात पूर्वेकडील नाला व मोकळ्या जागेतील पाणी दोंडाईचा रस्त्यालगतच्या नवीन वसाहतींमधील काही नागरिकांच्या घरांमध्येदेखील शिरते. यामुळे या भागातील नाल्यांमधील घाण कचरा व मातीचे ढीग काढून त्यांचे खोलीकरण केल्यास पावसाळ्यात पाण्याची योग्य विल्हेवाट लागून नागरिकांचे होणारे हाल थांबणार असल्याने पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.