अमृत आहार योजनेला लागली घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:26 IST2019-04-02T12:26:01+5:302019-04-02T12:26:17+5:30
कुपोषण मुक्ती : निधीचा अभाव, प्रशासन म्हणते मागणी करणे आवश्यक

अमृत आहार योजनेला लागली घरघर
तळोदा : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील अंगणवाड्यांमधील गरोदर मातांना दिला जाणारा अमृत आहार निधी अभावी गेल्या १५ दिवसांपासून बंद असून, संबंधीत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या अंगणवाड्यांना रक्कम उपलब्ध करून देण्याची अपेक्षा लाभार्र्थींनी केली आहे.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे ही बाब उघड करण्यात आली आहे. कुपोषणाचे वाढते प्रमाण कमी करून गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी राज्यशासनाने गेल्या दोन वर्षापासून डॉ.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. ही योजना संबंधीत गावांच्या अंगणवाड्यांमार्फत सुरू करण्यात आलेली आहे. या अंगणवाड्यांमार्फत स्तनदा व गरोदर मातांना अंगणवाड्यांमध्ये दाखल करून तेथे वरणभात, भाजी पोळी आणि अंडी असा सकस आहार रोज दिला जात असतो. यासाठी शासनाकडून एका लाभार्थ्यास ३५ रूपयांचे अनुदान दिवसाला दिला जात असतो. ही योजना एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत राबविली जाते. संबंधीत प्रशासन आगाऊ त्या अंगणवाडी सेविकेच्या बँक खात्यावर अनुदान वितरीत करत असतात. परंतु तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील अंगणवाडी क्रमांक चार व पाच यांना आहार योजनेची रक्कम दिली नसल्याने या दोन्ही अंगणवाड्यांमध्ये साधारण गेल्या १५ दिवसांपासून अमृत आहार बंद करण्यात आला आहे.
या दोन्ही अंगणवाड्या साधारण प्रत्येकी १८ अशा ३६ स्तनदा, गरोदर मातांना आहारापासून वंचित राहावे लागत आहे. आहारासाठी यामाता रोज अंगणवाड्यांमध्ये थेटे घालत आहेत. परंतु अनुदान नसल्याने त्यांना रोज निराश होऊन परतावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली.
वास्तविक प्रशासनाकडून तीन महिन्याचे आगाऊ अनुदान संबंधीत अंगणवाडी सेविकास देण्याचे स्पष्ट नियोजन असतांना रक्कम देण्याबाबत का उदासिन धोरण घेतले जात असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अंगणवाडी सेविकांनी आहार योजनेच्या निधीची मागणी प्रशासनाकडे केली आहे, असे असतांना त्यावर कार्यवाही करण्यात न आल्याने लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आहाराची रक्कम मिळालेली असतांना त्या सेविकांनी स्वत:ची रक्कम टाकून आतापावेतो लाभार्र्थींना आहार दिला आहे. त्यात खंड पडू दिला नाही. परंतु त्यांचीही आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे नाईलाजास्तव त्यांना आहाराच बंद करावा लागला आहे.
याबाबत तळोदा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारले असता आहाराची रक्कम संबंधीत अंगणाडी सेविकांना उलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय निधीची मागणीही त्यांनी करायला पाहिजे, असे सांगण्यात आले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन अंगणवाड्यांना योजनेची रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थिंनी केली आहे.
दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथील अंगणवाडीतही निधी अभावी अशीच आहार बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथेही प्रशासनाने रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.