नवापूर : ७२ गावांमध्ये कोरोना रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST2021-04-27T04:31:08+5:302021-04-27T04:31:08+5:30
नवापूर तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ४९१ रूग्ण पॉझिटिव्ह आले यातून २ हजार ३३४ रूग्ण बरे झाले १ हजार १०८ ...

नवापूर : ७२ गावांमध्ये कोरोना रुग्ण नाही
नवापूर तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ४९१ रूग्ण पॉझिटिव्ह आले यातून २ हजार ३३४ रूग्ण बरे झाले १ हजार १०८ रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहे. ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात कोरोनाचा आलेख कमी होताना दिसत आहे.
पळसुन गावात ५ एप्रिल २१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पळसुन येथे कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. पळसुन गावातील ४५ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर कुंकराण गावात २३ रूग्ण आढळून आले होते. कोराेना रुग्णांना उपचारासाठी नवापूर रुग्णालयात पाठवले तर काहींना लक्षणं नसल्याने रुग्णांना शेतात क्वारंटाईन करण्यात आले होते.
पळसून प्राथमिक आरोग्य अधिकारी डाॅ योगेश वळवी व कर्मचारी तसेच पळसुन ग्रा.प.सरपंच,उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ यांनी मिळून गावातच जि.प.शाळेत विलगीकरण कक्ष तयार केला व ४५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले व पूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. मास्क, साॅनिटायझर ग्रामपंचायत तर्फे पूर्ण गावात वाटप करण्यात आले. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या आदेशाने गांव बंद करण्यात आले. गावातील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे देण्यात आली होती. संपूर्ण गावातील ४५ रूग्ण कोरोना नियंत्रित झाले.या प्रकारे सर्व रुग्णांची प्राथमिक अवस्थेत कोरोना टेस्ट झाल्यामुळे कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर सारख्या महागड्या उपचाराची आवश्यकता भासली नाही. असा दावा सरपंच संतोषकुमार गवळी यांनी केला आहे . पळसून गावातील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामसेवक,तलाठी, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्स,शिक्षक, ग्रामस्थ यांनी योग्य नियोजन केल्याने कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यातील या गावात खबरदारीच्या योग्य नियोजन झाल्याचे दिसून आले. पळसुन व कुंकराण गाव कोरोना नियंत्रित होऊन इतर गावासाठी कोरोनावर कशी मात करावी याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
ज्या गावातील स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष असतील तर त्या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधासह इतर सुविधेची कमतरता जाणवत नाही. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशाच पद्धतीने ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.