नवापूर पालिकेने केले ६० सफाई कर्मचारी कमी, तीन दिवसांत कामावर न घेतल्यास कचरा फेको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:42+5:302021-08-19T04:33:42+5:30
नवापूर नगरपालिका घनकचरा प्रकल्पाची मुदत संपाल्यावरदेखील नवीन निविदा काढली नसल्याने व पूर्वीच्या ठेकेदाराने एकूण ७५ सफाई कामगारांना मागील दोन ...

नवापूर पालिकेने केले ६० सफाई कर्मचारी कमी, तीन दिवसांत कामावर न घेतल्यास कचरा फेको आंदोलन
नवापूर नगरपालिका घनकचरा प्रकल्पाची मुदत संपाल्यावरदेखील नवीन निविदा काढली नसल्याने व पूर्वीच्या ठेकेदाराने एकूण ७५ सफाई कामगारांना मागील दोन वर्षाचे थकीत वेतन अदा न केल्याने आज त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे. नगरपालिकेने ७५ पैकी १५ सफाई कामगारांना कामावर ठेवले असून, बाकीच्या कामगारांना कमी केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ३ दिवसांच्या आत नवापूर नगरपालिकेने थकीत वेतन द्यावे व १५ वर्षांपासून काम करीत आहे अशा कर्मचाऱ्यांना परत कामावर घ्यावे, अन्यथा भाजपतर्फे नवापूर नगरपालिकेवर सफाई कामगार यांच्या उपस्थित कचरा फेको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी असर्मथता दाखविल्यानंतर जि. प. सदस्य भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षाच्या घरी मोर्चा वळविला. त्यांचा घरासमोर घोषणाबाजी करण्यात आली. नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सर्व सफाई कामगारांचे म्हणणे समजून घेत तीन दिवसात थकीत वेतन देण्यासाठी व सफाई कामगारांना परत कामावर घेण्यासाठी मी बांधील आहे, असे आश्वासन दिले. आश्वासना मिळाल्यानंतर भरत गावीत यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.
अन्यथा, भाजपतर्फे व नवापूर शहरातील नागरिकांच्या मदतीने नगरपालिका कार्यालयात कचरा फेको आंदोलन..!!
नवापूर नगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी सफाई कामगारांना कामावरून कमी केले आहे. या कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी व ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात नवापूर भाजपतर्फे भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख व न. पा. सफाई कामगार यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी व न.पा. मुख्याधिकारी महेश चौधरी यांना निवेदन दिले होते. संबंधित ठेकेदाराची चौकशी न करता कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा प्रताप नवापूर पालिकेने केला आहे.
कामगारांना कामावरून काढून का टाकले, असा प्रश्न भाजप तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला असता मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय कारण दाखवत घोंगडे झटकून टाकले. सफाई कामगारांना कामावरून काढून टाकल्याने नवापूर शहर आज घाणीच्या डोंगरावर उभे आहे. शहारात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. स्थानिक रुग्ण जवळच्या गुजरात राज्यातील व्यारा, सुरत, बारडोली येथे जाऊन औषध उपचार घेत आहेत. तसेच शहरातील दवाखान्यांतसुध्दा रुग्णांची गर्दी होत आहे.
नवापूर शहराचा वाली कोण..?
सफाई कामगारांना कामावरून कमी करण्याच्या घटनेला आज महिना झाला आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवापूर शहराचा वाली कोण, असा प्रश्न जनतेने उपस्थित केला आहे. नवापूर पालिका प्रशासनाला आमची विनंती आहे की, सफाई कामगारांना लवकरात लवकर पुन्हा सेवेत सामावून घेऊन शहरवासीयांचे आरोग्याचे रक्षण करावे. तीन दिवसांत नवापूर पालिका प्रशासनाने सफाई कामगारांना कामावर न घेतल्यास पालिका कार्यालयावर शहरातील नागरिकांच्या मदतीने कचरा फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही अपरिचित घटना घडल्या तर त्यास सर्वस्वी जबाबदारी नवापूर पालिका प्रशासन, नगरसेवक, मुख्याधिकारी यांची राहील असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाजप तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख यांचा सह्या आहेत.