शहाद्यात उमेदवारांसह समर्थकांच्या गर्दीमुळे तहसीलला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:08 IST2019-12-24T12:08:01+5:302019-12-24T12:08:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा येथे तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने परिसराला ...

The nature of the trip to Tahsil due to the rush of supporters along with the candidates in the martyrdom | शहाद्यात उमेदवारांसह समर्थकांच्या गर्दीमुळे तहसीलला यात्रेचे स्वरूप

शहाद्यात उमेदवारांसह समर्थकांच्या गर्दीमुळे तहसीलला यात्रेचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा येथे तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे घर व डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गर्दी केली होती. सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयात जाऊन आपले अर्ज दाखल केले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या बंगल्यावर सकाळपासून गर्दी केली होती. इच्छुक उमेदवारांचे अर्ज माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील व कार्यकर्त्यांनी भरून घेतले तेथून एकत्रितपणे तहसील कार्यालयात जाऊन आपले अर्ज दाखल केले. आज डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालयातही दिवसभर धावपळ सुरू होती. माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी तालुकाप्रमुख मधुकर मिस्त्री यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याचे घोषित केल्यानंतर आज सर्व जागांसाठी एकत्रितपणे अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी आघाडी झाली नसल्याने या तीनही पक्षांतर्फे स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आल्याने तालुक्यातील बहुतेक ठिकाणी चौरंगी लढती होतील अशी शक्यता आहे. प्रांत अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी अर्ज स्वीकारले.

तालुक्यातून ३०९ अर्ज दाखल करण्यात आले. १४ गटांसाठी १३७ व पंचायत समितीच्या २८ गणांसाठी १७२ इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. सोमवारी अखेरच्या दिवशी मात्र अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. आज अखेरचा दिवशी सर्वांनीच आपापल्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी नामांकन पत्र स्विकारले. यात लोणखेडा गटातून जयश्री उर्फ कांचन दीपक पाटील, पाडळदा गटातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनराज पाटील यांनी भाजपाकडून नामांकन अर्ज दाखल केला तर काँग्रेसतर्फे अभिजीत पाटील यांनी तर माकपा कडून दिपक जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दाखल केला. म्हसावद गटातून अभिजीत पाटील काँग्रेस कडून, डॉ. भगवान पाटील यांनी भाजपाकडून नामांकन अर्ज दाखल केले. कहाटूळ गटातून प्रतिभा न्हानू माळी, शिवसेना, मीना आत्माराम बागले काँग्रेस, शालू भटू सनेर आदींनी नामांकन दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व माजी सदस्य ऐश्वर्या रावल यांनी कोणत्याही गटात नामांकन अर्ज दाखल केलेले नाहीत. यावेळी ते निवडणुकीपासून लांबच असल्याचे दिसून आले.

Web Title: The nature of the trip to Tahsil due to the rush of supporters along with the candidates in the martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.