नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवनशाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:15 IST2020-08-07T13:15:21+5:302020-08-07T13:15:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही राज्यातील सर्व ...

Narmada Bachao Andolan's life school started | नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवनशाळा सुरू

नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवनशाळा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद असताना नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या जीवनशाळा मात्र सुरू करण्यात आल्या आहेत. ३ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनापासून या शाळा सुरू झाल्या असून त्याबाबत शिक्षण विभागाला पत्र देऊन कळविण्यात आले आहे.
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे नंदूरबार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अनुदानाशिवाय सात जीवनशाळा चालवल्या जातात. या जीवनशाळांमध्ये १०० टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात शहरापासून दूर आहेत. तेथे पोहोचण्यासाठी चांगल्या स्थितीतील रस्तादेखील नसून आतापर्यंत हा प्रदेश कोरोनामुक्त राहिला आहे.
नविन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अद्याप शाळा सुरू करता येत नसल्याने आदिवासी क्षेत्रातील शिक्षणाची ओढ कमी होऊन आदिवासी समाजाचे अपरिमीत नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांची शिक्षक, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायीक व इतर क्षेत्रात प्रगतीशील बनण्याची प्रगती प्रक्रिया खंडित होण्याचा धोका जाणवतो. म्हणून नर्मदा नवनिर्माण अभियानाला गावकरी, पालक, शिक्षक यांच्या सहमतीने शाळा सुरू करण्याची गरज जाणवली. त्यातून नर्मदा नवनिर्माण अभियानाच्या पाच शाळा ३ आॅगस्टपासून सुरु करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागासह नंदुरबार जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आली आहे.
३ आॅगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या जीवन शाळांमध्ये डनेल, मणिबेली, भाबरी, थुवानी, जीवननगर, ता.शहादा या शाळांचा समावेश आहे. या शाळा सुरू करण्यासाठी गावकरी, पालक, शिक्षक, शाळा देखरेख समिती इत्यादींनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी चिंता व्यक्त करीत शाळा सुरू करण्याबाबत सहमतीपत्र लिहून देत जीवनशाळा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पालक, शिक्षक व देखरेख समितीचे सहमतीपत्र व ठरावही शिक्षण विभागाला सादर करण्यात आले आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर या शाळांमध्ये त्याच गावातील मुले व एकही कोरोनाग्रस्त व्यक्ती न सापडलेल्या जवळच्या गावातील मुले राहतील, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक दूरत्व राखून शिक्षण, रोगप्रतिकारक काढा व स्वच्छता, मास्क, यासह सर्व नियम सर्वांनी पाळून शाळा चालवण्याचे नर्मदा नवनिर्माण अभियानचे नियोजन असून यासाठी पहिल्या दिवशी मुलांना पालकांना प्रबोधित करण्यात आले आहे. उर्वरित अभ्यासक्रम व शिक्षक यांची सांगड घालून देणार असल्याचे शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फेच्या वतीने शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या पत्रात शासनाकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. त्यात या शाळा असलेल्या गावात शासकीय योजनेनुसार, एएनएम (नर्स), डॉक्टर, दवाखाना (स्थानिक तसेच जलतरंग दवाखाना) आवश्यक सर्व उपकरणे, औषधे इत्यादीसह सुरळीत व नियमित चालावा याचा समावेश आहे. यानिमित्ताने या वंचित, दुर्लक्षित उपेक्षित क्षेत्रातील आदिवासी समाजासाठी आरोग्यसेवा व्यवस्थाही सुधारित व्हावी व विशेष दक्षता देखरेख शासनाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सुनिश्चित करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय वरील सर्व बाबी लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातही शाळाप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंतीही पत्रात नमूद करण्यात आली आहे. पत्रावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, नुरजी वसावे, विजया चव्हाण, लतिका राजपूत आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Narmada Bachao Andolan's life school started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.