नंदुरबारचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:47+5:302021-05-13T04:30:47+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा ग्राफ कमालीचा घसरला आहे. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांनी कमी होऊन तो पाच ते सहाच्या ...

नंदुरबारचा पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांनी घसरला
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा ग्राफ कमालीचा घसरला आहे. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांनी कमी होऊन तो पाच ते सहाच्या दरम्यान स्थिरावला आहे. मृत्यूदर देखील १.८२ टक्के इतका आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा ते एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा यादरम्यान मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत होते. दररोज ८०० ते १३०० दरम्यान रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे पॅाझिटिव्हिटी रेट हा तब्बल २० ते २५ टक्केपर्यंत पोहोचला होता. जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून तसेच १ एप्रिलपासूनच संपूर्ण संचारबंदी लागू करून कोरोनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार आठवड्यात रुग्ण दर कमी झाला. गेल्या दोन दिवसांपासून १०० च्या आतच रुग्णसंख्या नोंदविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना पॅाझिटिव्हिटी रेट हा पाच ते सहा टक्केदरम्यान स्थिरावला आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात १५ हजार ५३१ रुग्ण आढळले होते. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात केवळ एक हजार ७९३ रुग्ण आढळले आहेत.
दुसरीकडे कोरोना मृत्यू संख्येचा आकडा देखील कमी होऊ लागला आहे. ८ ते १३ च्या संख्येने होणारे मृत्यू आता पाच ते सातवर आले आहेत. मृत्यूदर केवळ १.८२ टक्के आहे. एप्रिल महिन्यात २६६ जणांचा मृत्यू झाला, तर मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसात ९२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.