नंदुरबारकर ९ आकड्याच्या प्रेमात, नंबरप्लेटसाठी मोजतात हजारो रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:19 IST2020-12-19T11:19:30+5:302020-12-19T11:19:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. त्याचा प्रत्येय फॅन्सी व व्हीआयपी नंबर प्लेट मिळविण्यासाठी ...

नंदुरबारकर ९ आकड्याच्या प्रेमात, नंबरप्लेटसाठी मोजतात हजारो रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. त्याचा प्रत्येय फॅन्सी व व्हीआयपी नंबर प्लेट मिळविण्यासाठी अनेकांचा आटापीटा समोर येतो. त्यासाठी हजारो आणि लाखो रुपये खर्च करण्याचीही संबधितांची तयारी असते. यात नंदुरबार जिल्ह्यातील वाहन प्रेमी देखील मागे नसल्याचे दिसून येते. अशा नंबर प्लेटच्या माध्यमातून आरटीओ विभागाला दोन वर्षात तब्बल ७१ लाख ८८ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
लाखो रुपयांची अलिशान कार खरेदी करतांना त्या कारचा नंबरही लकी किंवा पसंतीचा पाहिजे अशी अनेकांची धारणा असते. अनेकांना वेगवेगळे नंबर लकी असतात. त्या अंकाचे नंबर मिळावे किंवा अंकांची बेरीज तशी यावी अशा पद्धतीने नंबर मिळविण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. चॅाईस नंबरच्या माध्यमातून महसूल मिळू शकतो हे हेरून शासनानेही कायदा करून असे नंबर विशिष्ट रक्कम भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. विशिष्ट नंबरसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. यासाठी साध्या कागदावर आरटीओ विभागाकडे अर्ज करता येतो. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यासाठीचे शुल्क भरावे लागते. एकाच नंबरची एकापेक्षा अधीक जणांनी मागणी केल्यास तो पेच सोडविण्यासाठी त्या नंबरचा लिलाव केला जातो. जो जास्त बोली लावेल त्याला तो नंबर दिला जातो. त्यासाठीचे आरक्षण मात्र केवळ ३० दिवसांचे असते. सहसा कारसाठीच अशा नंबरची चॅाईस असते. इतर वाहनांसाठी अर्थात दुचाकी, तीन चाकी किंवा जड वाहनांना चॅाईस नंबर सहसा घेतला जात नसल्याचे चित्र आहे.
२०१९ आरटीओची कमाई ३४,१३,००० २०२० (नोव्हेंबरपर्यंत) आरटीओची कमाई ३७,७५,०००
या तीन नंबर्सना सर्वाधिक दर
४४४४ = २,१०,००० (रुपये) ०९९९=१,५०,०००(रुपये) ५६००=०,५०,००० (रुपये)
९ आकड्याच्या नंबरला नंदुरबारकरांची मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील वाहनमालकांची मागणी सहसा ९ या आकड्याला सर्वाधिक असल्याचे दिसून येते. सर्वाधिक किंमतीला नंबर विकले गेले त्यात ९ या आकड्याचा सर्वाधिक भरणा आहे. त्या खालोखाल ०० या आकड्यालाही बऱ्यापैकी मागणी आहे. इतक आकड्यांमध्ये ४, ६, ८ यांचीही चांगली चलती दिसून येते. किमान ४५ हजार व जास्तीत जास्त दोन लाख १० हजार रुपयांपर्यंत नंबर विक्री झाली आहेत.
शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम आर ५४ अंतर्गत चॅाईस नंबरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संबधीत नंबरसाठी विशिष्ट शुल्क अकारणी करण्यात येते. या माध्यमातून विभागाला चांगला महसूल मिळत आहे. यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. वाहनमालकांनी त्याचा लाभ घ्यावा.
- नानासाहेब बच्छाव,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.