संडे स्पेशल मुलाखत-देशात नंदुरबारला टॉप टेनमध्ये आणणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:20 IST2020-08-23T12:20:45+5:302020-08-23T12:20:55+5:30
स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत देशात आघाडी स्वच्छ शहर सुंदर शहराचा सकल्पच पालिकेने केला आहे. दुर्देवाने एका गुणासाठी देशात टॉपटेनच्या यादीत येऊ शकलो नाही याची खंत आहे -रत्ना रघुवंशी

संडे स्पेशल मुलाखत-देशात नंदुरबारला टॉप टेनमध्ये आणणारच
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत नंदुरबार पालिकेने देशात टॉप-१० मध्ये येण्याचा संकल्प केला होता. परंतु एका मुद्यात अवघ्या एका गुणाची कमतरता राहिली आणि ही संधी गेली. यापुढे सर्व त्रूटी दूर करून पुन्हा नव्या दमाने आणि नियोजनाने तसेच जनतेचे सहकार्य, सत्ताधारी, विरोधकांच्या सहयोगाने या उपक्रमात उतरून देशात नंदुरबारला स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप-१० मध्ये आणणारच असा संकल्प नंदुरबारच्या नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.
स्वच्छतेसाठी आणि या उपक्रमासाठी काय नियोजन केले?
नंदुरबार पालिकेने सलग तिसऱ्यांदा या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी नियोजनबद्ध प्द्धतीने काम केले. कुठेही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. कचरा संकलन, त्याची विल्हेवाट, हगणदारीमुक्त शहर, महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, सॅनिटरी नॅपकीन मशीन लावणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता याला प्राधान्य दिले गेले. सर्व घटकांनी या कामात आपल्या परीने योगदान दिले त्यामुळे हे शक्य झाले.
टॉपटेनचा संकल्प असतांना ४१ व्या क्रमांकावर समाधान का मानावे लागले?
देशात नंदुरबार टॉप टेन मध्ये यावे यासाठीच काम करण्यात आले. केद्राची कमिटीनेही पालिकेने केलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. सर्व घटक आणि मुद्यात चांगले गुण मिळाले. परंतु एका मुद्यातील एक गुण कमी मिळाला आणि आपला नंबर हुकला. तरीही देशात पहिल्या ५० शहरात येणे ही बाबही कमी नाही.
जनतेला काय आवाहन करणार?
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनतेने नेहमीच सहकार्य केले आहे. यापुढी काळात देखील जनतेच्या बळावरच आपल्याला काम करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता राखावी, कचरा गाडीतच कचरा टाकावा, सार्वजनिक जागांची निगा राखावी, नियमांचे पालन करावे हीच अपेक्षा आहे.
शासनाच्या नियमानुसार आता कचरा डेपोसाठी नवीन जागा मिळणार नाही. त्यामुळे पालिकेने दुधाळे शिवाारातील कचरा डेपोतील कचºयाची ९० टक्के विल्हेवाट लावली. ओला, सुका कचरा वेगळा ठेवणे, बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावली जात आहे. ही बाब केद्रीय समितीनेही अधोरेखीत केली होती.
पालिकेच्या घंटा गाड्या दररोज घरोघरी कचरा संकलन करतात. नागरिकांना पालिकेतर्फे ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबीनही पुरविण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा दररोज सकाळी उचलला जातो. सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेथे स्वच्छता असते ते लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते, त्यानुसार शहवासीयांनी स्वच्छतेचा घेतलेला वसा असाच कायम ठेवावा अशी अपेक्षाही रत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केली.