अर्ध्या तासातच झाले नंदुरबार जलमय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:34 IST2021-01-09T11:31:55+5:302021-01-09T11:34:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघ्या अर्धा तासाच्या पावसाने नंदुरबार जलमय झाले होते. अनेक भागात पाणी साचले होते. मुख्य ...

अर्ध्या तासातच झाले नंदुरबार जलमय!
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवघ्या अर्धा तासाच्या पावसाने नंदुरबार जलमय झाले होते. अनेक भागात पाणी साचले होते. मुख्य बाजाराच्या परिसरात तर गुडघ्याऐवढे पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अनेक रस्त्यांवर पाटाच्या पाणीसारखे पाणी वाहत होते. काही ठिकाणी भुमीगत गटारींचे चेंबर जाम झाल्याने समस्या निर्माण झाली होती. दरम्यान, मिरची पथारींवर पुन्हा पाणी साचल्याने व्यापारींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी काही भागात पावसाचा हलकासा शिडकावा देखील झाला. शुक्रवारी देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरू होता. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती झाली होती.
शहरातील मंगळ बाजारात तर गुडघ्याऐवढे पाणी साचले होते. या भागातील काही ठिकाणी ड्रेनेज जाम झाल्याने त्यातून देखील पाणी वाहत असल्यामुळे समस्येत आणखी भर पडली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सायंकाळी उशीरापर्यंत पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. त्यामुळे किरकोय व्यापारींनी आपले दुकान बंद करून घरी जाणे पसंत केले.
गवळीवाडा, नवी भोई गल्ली या भागातून येणारे पाणी थेट यार्दीचे राममंदीर, जुनी भोईगल्लीमार्गे मंगळ बाजारात जाते. त्यामुळे या परिसरात सायंकाळी उशीरापर्यंत अक्षरश: पाण्याचे पाट वाहत होते.
शुक्रवारी लग्नाची तिथी मोठी होती. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच तारांबळ उडाली होती. सायंकाळचे लग्न असलेल्या ठिकाणी तर धावपळ झाली.
बाजार समितीत उघड्यावर असलेले धान्य पावसामुळे खराब झाले. उतारावरील भागात पाणी वाहून आल्याने धान्य ठेवलेले पोते त्यात भिजले. यामुळे व्यापाऱ्यांचे तसेच या ठिकाणी विक्रीसाठी धान्य आणलेल्या शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे.
पावसामुळे उघड्यावर राहणाऱ्या कुटूंबांचे देखील मोठे नुकसान झाले. त्यांच्या झोपडी परिसरात पाणी साचले. काहींचे साहित्य पाण्यात भिजले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. करण चौफुली, भोणे फाटा या भागातील उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल झाले.
आजच्या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. फळ पिकांमध्ये पपईचे नुकसान झाले आहे. सातपुड्यातील आंब्यांना नुकताच मोहर लागण्यास सुरुवात झाली असतांना या पावसामुळे मोहर देखील गळून पडण्याचा धोका आहे. त्यामुळे शेेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या चार दिवसात आणखी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.
पथारीवरील मिरची पुन्हा भिजली...
दोन आठवड्यांपूर्वी देखील जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार शहर परिसरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पथारीवरील मिरची भिजली होती. जेमतेम पथारींवरील जागा सुकली होती. आता पुन्हा भिजली आहे. त्यामुळे मिरची काळी पडण्याचा धोका आहे. आजच्या पावसात तर मिरची पाण्यावर तरंगतांना अनेक ठिकाणी दिसून आली.