कुपोषीत बालकांचा नंदुरबारचा स्क्रिनिंग पॅटर्न राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:06 IST2020-08-23T12:06:45+5:302020-08-23T12:06:52+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतांनाही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग, आरोग्य ...

कुपोषीत बालकांचा नंदुरबारचा स्क्रिनिंग पॅटर्न राज्यभर राबविणार
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतांनाही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व युनिसेफने जिल्ह्यातील ० ते सहा वयोगटातील बालकांच्या सर्व्हेक्षणासाठी राबविलेली धडक मोहिम यशस्वी ठरल्याने त्याचे कौतूक राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनी केले आहे. नव्हेतर नंदुरबार पॅटर्न आता राज्यात सर्वत्र राबविण्याचा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीनंतर हजारो कुटूंब रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत होतात. हे कुटूंब दरवर्षी फेब्रुवारीनंतर आपापल्या गावी येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागातर्फे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी मार्च महिन्यात कुपोषित बालकांच्या सर्व्हेक्षणासाठी स्क्रिनिंग प्रक्रिया राबवितात. यंदा मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया लांबली. त्यातच अंगणवाड्याही बंद असल्याने ० ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर व आहारावर नियंत्रण ठेवणे काहीसे अवघड झाले होते.
कुपोषणामुळे बालमृत्यू वाढू नये यासाठी महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा एक सुक्ष्म नियोजन करून धडक मोहिम राबविण्यात आली. त्यात ० ते ६ वयोगटातील बालके, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.
याशिवाय लसीसकरण आणि सॅम व मॅम बालकांची धडक शोध मोहिमही राबविण्यात आली. त्यासाठी प्रत्येक आरोग्य केद्र, उपकेंद्र तथा अंगणवाडी निहाय सुक्ष्म कृती नियोजन मुख्याधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याकरीता विविध स्तरावर कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची क्षमता बांधणी करून उपकेंद्रनिहाय पथक तयार करण्यात आले. या पथकात वद्यकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका, सेवक आणि स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी तथा ग्राम स्तरावर अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती आणि मदतनीस यांच्या पथकाद्वारे प्रत्येक अंगणवाडीनिहाय ही शोधमोहिम राबविली गेली. ती यशस्वी ठरल्याने महिला बालकल्याण विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन यांनी या मोहिमेचे विशेष कौतूक केले असून राज्यातही नंदुरबार पॅटर्न प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कोविडच्या पार्श्वभुमीवर ही धडक मोहिम राबविण्यात आल्याने सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्यासाठी तपासणी करतांना आधी बालक किंवा गरोदर माता यांची ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास याची चौकशी करून तपासणी करण्यात आली. वजन मापे करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनंतर साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात आले. सव्हेक्षण करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रिपल लेअर मास्क, फेस शिल्ड, ग्लोज, सॅनिटाईझर आदी साहित्य देण्यात आले. लाभार्र्थींना अंगणवाडीत बोलवितांनाही सर्व नियम व सावधानता बाळगण्यात आली.
सॅम व मॅम बालकांची शोध मोहिम तथा किशोरवयीन मुली व गरोदर मातांची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेने राबविलेली विशेष धडक मोहिम चांगल्या पद्धतीने राबविली गेली. त्याची दखल महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनीही घेतली असून हेच पॅटर्न राज्यात सर्व जिल्ह्यात राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही तयार केलेला सुक्ष्म कृती आराखडा त्यांनी मागविला आहे.
-विनय गौडा, मुख्यय कार्यकारी अधिकारी, जि.प.नंदुरबार.