नंदुरबारपासून नर्मदापर्यंत सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:31 PM2020-03-23T12:31:03+5:302020-03-23T12:31:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या विरोधातील युद्धासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील जनतेने एकजूट दाखवत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता ...

From Nandurbar to Narmada, silence | नंदुरबारपासून नर्मदापर्यंत सन्नाटा

नंदुरबारपासून नर्मदापर्यंत सन्नाटा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या विरोधातील युद्धासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील जनतेने एकजूट दाखवत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. सकाळी सात वाजेच्या आतच अनेकांनी यात सहभाग घेतला. रात्री १२ वाजेपासूनच जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात आल्या. एकही वाहन जिल्ह्यात येवू दिले नाही किंवा जिल्हाबाहेर जावू देण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यांवर दिवसभरात एकही वाहन दिसून आले नाही. रेल्वे सेवा देखील ठप्प होती केवळ नवजीवन एक्सप्रेस आणि सिकंदराबाद-नांदेड ंआणि आणखी दोन एक्सप्रेस रेल्वेस्थानकावर आल्या. उधना-पाळधी मेमू ट्रेनला शनिवारी रात्रीपासूनच नंदुरबार स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते. बसस्थानकात शुकशुकाट होता. प्रवासीच नसल्याने एकही बस फेरी झाली नाही.
नंदुरबार शहरात सर्वत्र निरव शांतता होती. वाहनांचे आवाज नाही, विक्रेत्यांची फेरी नाही, बांधकामाच्या ठिकाणी ठोकपीठ नाही की गल्लीबोळात आणि मैदानांवर खेळणाऱ्यांचा आरडाओरड नाही अशी निरव शांतता नंदुरबारकरांनी पहिल्यांदाच अनुभवली. सर्वच कुटूंबांनी घरातच कुटूंबियांशी विविध खेळात मन रमवले. काहींनी घरातील साफसफाईला महत्व दिले तर काहींनी वाचन आणि टीव्ही पहाण्यात मन रमविले.
शहरी भागातच नाही तर सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा, मोलगी, धडगाव, तोरणमाळ यासारख्या भागात देखील जनता कर्फ्यू पाळण्यात आला. नंदुरबार ते थेट नर्मदा काठावरील गावांपर्यंत याची जाणीवजागृती झाल्याने लोकांनी हा बंद स्वयंस्फूर्तीने पाळला.
दोघांना नेले रुग्णालयात
होम कॉरेंटाईन असलेले दोन जण रेल्वेने नंदुरबारात पहाटे आले. त्यानंतर ते आपल्या गावी जाण्यासाठी नंदुरबार बसस्थानकात आले. तेथे काहींनी त्यांना पाहिल्यानंतर लागलीच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कळविण्यात आले. पहाटे पाच वाजता रुग्णवाहिका बसस्थानकात आल्यावर दोनी कॉरेंटाईन असलेल्या युवकांना घेवून सिव्हीला नेले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. होम कॉरेंटाईन असतांनाही त्यांनी रेल्वेने प्रवास केला नंतर बसने प्रवास करण्यासाठी ते जाणार होते. असाच एक रुग्ण नंदुरबार तालुक्यातील एका गावात फिरत होता. ग्रामस्थांनी त्याला घरात राहण्यास सांगूनही त्याने न ऐकल्याने अखेर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळविल्यानंतर त्याला नंदुरबारला नेण्यात आले.
१४ युवकांची तपासणी
दक्षिण भारतात देव दर्शनासाठी गेलेले १४ युवक नवजीवन एक्सप्रेसने सकाळी ११ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकात उतरले. त्यांची लागलीच तातडीने रेल्वे स्थानकातील आरोग्य पथकाने तपासणी केली. परंतु त्यांना कोणतीच लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना घरी जावू देण्यात आले. याच युवकांची विजयवाडा येथे रेल्वेने प्रवास करण्याआधी तेथील आरोग्य पथकाने देखील तपासणी केली होती. युवकांच्या म्हणण्यानुसार पुर्ण प्रवासात बाहेरचे काहीही खाल्ले नाही. सह प्रवाशांशी दूरूनच राहिल्याचे त्यांनी सांगितले.
सिमेवर तपासणी पथक
महाराष्टÑ व गुजरात राज्याच्या सिमेवर वाका चार रस्ता येथे गुजरात व महाराष्टÑाचे संयुक्त तपासणी पथक नेमण्यात आले होते. नंदुबार जिल्ह्यात येणाºया प्रत्येकाची येथे तपासणी केली जात होती.
एकही वाहन किंवा एकही व्यक्ती त्यातून सुटू नये याची काळजी घेतली जात होती. त्यासाठी पथकातील गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तडवी, पोलीस उपनिरिक्षक राकेश शिरसाठ, हरेश्वर पोतदार, राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तैणात होते. शहादा तालुक्यातील रायखेड, गव्हाळी, ता.अक्कलकुवा, बेडकीपाडा, ता.नवापूर, ठाणेपाडा, ता.नंदुरबार, रनाळे, ता.नंदुरबार या ठिकाणी देखील पथके तैणात करण्यात आली आहेत.


नंदुरबार : थेट नंदुरबार शहरापासून ते दुर्गम भागातील नर्मदा काठापर्यंतच्या जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखविली. रविवारी दिवसभर जिल्हाभरात शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी घरात बसूनच दिवस घालवला. सायंकाळी पाच वाजता अत्यावश्यक सेवेतील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकजण खिडक्यांमध्ये, गॅलरीत, घराच्या गच्चीवर, अंगणात येत थाळी वाजवत, घंटानाद करीत, टाळचा गजर करीत आणि टाळ्या वाजवत वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मात्र, जनता कर्फ्यूमध्ये काहीशी शिथीलता दिसून आली.

 

Web Title: From Nandurbar to Narmada, silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.