नंदुरबार-मुंबई स्लिपरकोच शिवशाही अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:14 IST2020-02-03T12:14:47+5:302020-02-03T12:14:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या नंदुरबार-मुंबई स्लिपर कोच शिवशाही बसचा शुभारंभ येथील आगारात करण्यात ...

नंदुरबार-मुंबई स्लिपरकोच शिवशाही अखेर सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या नंदुरबार-मुंबई स्लिपर कोच शिवशाही बसचा शुभारंभ येथील आगारात करण्यात आला. नंदुरबारसाठी आता आसन आणि स्लिपर कोच अशा दोन्ही बसेस मुंबईसाठी उपलब्ध आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातर्फे नंदुरबार-मुंबई शिवशाही बसचा शुभारंभ ज्येष्ठ प्रवासी साक्री येथील भालचंद्र गोविंदा कोठावदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यापूर्वी केवळ परिवर्तन बस असलेल्या सेवेनंतर प्रवाशांच्या आग्रहास्तव आता दररोज सायंकाळी पावणेआठ वाजता नंदुरबार -मुंबई शिवशाही बस सुरू करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबार तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या हस्ते नवीन शिवशाही बसचे पूजन करण्यात आले.
यावेळी नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, वाहतूक नियंत्रक प्रशांत गुजराती, सचिन पाटील, सहाय्यक वाहतूक नियंत्रक पी. के. अहिरे, वाहक रवींद्र बैरागी, चालक एम. एन. पिंजारी, नियमित प्रवासी सारंग ब्राह्मणकर आणि इतर प्रवासी उपस्थित होते. नाशिक मुंबई जाणाऱ्या प्रवाशांनी या नवीन बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, मुंबई व पुणेसाठी सायंकाळी प्रत्येकी दोन बसेस सुरू आहेत.