नंदुरबारात अल्पवयीन मुलीचा विवाह ऐनवेळी रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:53 IST2019-05-13T11:52:49+5:302019-05-13T11:53:11+5:30
तहसीलदारांची कारवाई : वधू शिरपूर तर वर नंदुरबारचा

नंदुरबारात अल्पवयीन मुलीचा विवाह ऐनवेळी रोखला
नंदुरबार : अल्पवयीन मुलीचा रविवार, १२ रोजी येथील विमल हॉसिंग सोसायटीमध्ये होणारा विवाह रोखण्यात तहसीलदार व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. मुहूर्ताच्या अवघ्या १५ मिनिटे आधी अधिकारी मंडपात पोहचले. यामुळे वºहाडी मंडळीमध्ये एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहून वधूच्या आईला मानसिक धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
शिरपूर येथील वधू व नंदुरबार येथील वरांचा रविवार, १२ मे रोजी विवाह निश्चित करण्यात आला होता. तांबोळी-बारी समाजाचे हे जोडपे होते. हळदीचा कार्यक्रमानंतर रविवारी दुपारी १२.३० वाजता विवाह लागणार होता. शनिवारी अज्ञात व्यक्तीने मुलीचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याची तक्रार मंत्रालयात व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात आले. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक बांगर, महिला व बालविकास अधिकारी वळवी, मंडळ अधिकारी यांना घेवून विवाहस्थळी गेले. यावेळी विवाहाची सर्व तयारी पुर्ण झाली होती. वरात मंदीरावरून निघाली होती. वधू ब्युटीपार्लरमधून मंडपात येत होती. मुहूर्ताला १५ मिनिटांचा अवधी असतांना पथक तेथे पोहचले. थेट मंडपात न जाता पथकाने १०० मिटर बाहेरच थांबणे पसंत केले. त्यानंतर वधू व वराकडील मंडळींना पाचारण केले.
तहसीलदार बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षाकडील मंडळींना मुलीचे वय १७ वर्ष तीन महिने असल्याचे सांगितले. सज्ञान अर्थात १८ वर्षाची मुलगी होत नाही तोपर्यंत विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले.
वधू व वराकडील मंडळींनी देखील समजूतदारपणा दाखवत विवाह रद्द करण्याचे ठरविले. १८ वर्ष वयानंतरच मुलीचे लग्न करणार त्या आधी केल्यास कारवाई करावी असे सांगितले. त्यामुळे तहसीलदार थोरात व अधिकाºयांनी तंबी देवून विवाह थांबविला. या सर्व प्रकारामुळे वºहाडी मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली. काय झाले कुणाला समजत नव्हते.
या प्रकारामुळे मात्र वधूच्या आईला मानसिक धक्का बसल्याने त्यांची मंडपातच तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.