नंदुरबार : निकालाबाबत प्रचंड उत्सूकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:19 IST2019-05-22T11:19:11+5:302019-05-22T11:19:44+5:30
दुपारी दीडपर्यंत कल होईल स्पष्ट, २७ फेऱ्यांचे नियोजन

नंदुरबार : निकालाबाबत प्रचंड उत्सूकता
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा सर्वाधिक अर्थात ६८.३३ टक्के मतदान झाल्याने निकालाची प्रचंड उत्सूकता लागून आहे. दरम्यान, मतमोजणीची तयारी पुर्ण झाली असून त्यासाठी एकुण ८४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकसभा मतदारसंघात एकुण १८,७०,११७ मतदारांपैकी १२,७७,७९६ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. एकुण ६८.३३ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात ७५.२८ टक्के तर सर्वात कमी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात अवघे ६२.३९ टक्के मतदान झाले होते.
लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या निवडणुकीतील यावेळचे सर्वाधिक मतदान झाले असल्याने निकालाबाबत प्रचंड उत्सूकता लागून आहे. त्यामुळे मतदारांचा कल कुणाकडे राहील याबाबत मतदारसंघात पैजा लागल्या आहेत. एक्झीट पोल देखील वेगवेगळे अंदाज वर्तवित आहेत.
दरम्यान, मतमोजणीची तयारी प्रशासनाने पुर्ण केली आहे. सहा विधानसभा मतदार संघासाठी एकुण ८४ टेबल राहणार आहेत. २७ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होईल. विधानसभा निहाय प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील पावतींचीही मोजणी होणार आहे. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे पाच ते सहा वाजतील असा अंदाज आहे. परंतु दुपारी दीड, दोन वाजेपर्यंत एकुण निकालाचा कल स्पष्ट होऊ शकेल असे बोलले जात आहे.