नंदुरबार जिल्ह्याला मिळणार ३७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:05 IST2020-05-31T12:05:16+5:302020-05-31T12:05:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती गंभीर राहण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या केवळ १० ...

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार ३७ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती गंभीर राहण्याची शक्यता असल्याने यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्के निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने पहिल्या तिमाहीसाठी नंदुरबार जिल्ह्याला ३७ कोटींचा निधी महसुली व भांडवली खर्चासाठी मिळणार आहे.
राज्यात कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीकरिता अनिवार्य व कार्यक्रम खर्चाच्या एकूण अर्थसंकल्पीत तरतुदीच्या १५ ते २५ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सर्व जिल्ह्याच्या मंजूर आकारमानाच्या केवळ १० टक्के निधी महसुली व भांडवली लेखा शिर्षकांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्याला ३७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या तरतुदीपैकी एकूण २५ टक्केपर्यंतचा निधी हा सार्वजनिक आरोग्य विभाग तथा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्यविषयक सुविधांसाठी खर्च करण्याची सक्ती शासनाने केली आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधा बळकट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्याची आर्थिक स्थिती यावर्षी गंभीर राहणार असल्याने खर्च करताना काटकसरीच्या सूचनाही शासनाने सर्व जिल्ह्यांना जारी केल्या आहेत.